प्रतिनिधी/ सातारा
किल्ले अजिंक्यताऱयाच्या समोरील उंटांचा डोंगर येथून बिबटय़ा पलीकडे पाटेश्वरच्या डोंगराकडे पुणे- बेंगळूर महामार्ग ओलांडून जाताना शुक्रवारी शेंद्रे (ता. सातारा) गावानजीक अनोळखी वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यूचा झाला. मृत पावलेल्या बिबटय़ावर वन विभागाकडून शवविच्छेदन सुरू आहे, अशी माहिती वन विभागाच्या शीतल राठोड यांनी दिली.
बिबटय़ाचा वावर हा किल्ले अजिंक्यतारा परिसर, यवतेश्वरचा डोंगर, उंटांचा डोंगर, जानाई मळाईचा डोंगर, पाटेश्वरचा डोंगर असा आहे. तर बिबटय़ा महामार्ग ओलांडून अलीकडे पलीकडे करतो. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत पुलाच्या पुढे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबटय़ा रस्त्यावर मृत अवस्थेत पडल्याचे इतर वाहनधारकानी वन विभागास कळवले. वनविभागाच्या पथकाने तेथे जाऊन पाहणी केली.
घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबटय़ास सातारा येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आले. अपघातात बिबटय़ाच्या जबडय़ास व डोक्यास मार लागला आहे, असे वन विभागाच्या शीतल राठोड यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर या मृत बिबटय़ावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन दिपावली दिवशीच मात्र बिबटय़ाला प्राण गमवावे लागल्याने प्राणीमित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे.
ओव्हर ब्रीजची मागणी धुळखात
खिंडीवाडी हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी देखील तीन बिबटय़ांना व अन्य वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. हे वन्यप्राणी अजिंक्याताऱयावरुन येवून खिंडवाडीच्या डोंगराकडे जात असतात. हा त्यांचा पारंपारिक मार्ग आहे. मात्र, नेमके रस्ता ओलांडताना त्यांचा बळी जातो. यासाठी तिथे रस्त्याखालून बोगदा तयार करावा असाही प्रस्ताव होता. तसेच आम्ही तिथे प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ओव्हरब्रीज उभारावा, अशी मागणी केलेली असून ती धुळखात पडून आहे. त्याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.