प्रतिनिधी / नागठाणे :
ग्वाल्हेर-बेंगळूर आशियाई महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीत एसटी बसला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या नादात अज्ञात मालट्रकने पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला मालट्रक खाली सापडून जागीच ठार झाली. तर दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला.
सारिका तानाजी मोहिते (वय.३२,रा.नागठाणे,ता .सातारा) असे मृत महिलेचे नाव असून वैभव विलास सकटे (वय.१९, रा.अंगापूर, ता.सातारा) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. अपघातानंतर मालट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला.
याबाबत घटनास्थळ व बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास वैभव सकटे हा त्याच्या दुचाकीवरून त्याची मावसआत्या सारिका मोहिते यांना घेऊन शेंद्रेहून नागठाणेकडे निघाला होता. महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या पाठीमागे असलेल्या शिवशाही एसटी बसला अज्ञात मालट्रक हा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात असताना त्याने पुढे चाललेल्या वैभव सकटे यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.
धडकेने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सारिका मोहिते या महामार्गावर पडल्या तर दुचाकीसह वैभव सकटे हा महामार्गाच्या बाजूला पडला.याचवेळी महामार्गावर पडलेल्या सारिका मोहिते या त्या मालट्रकच्या चाकाखाली आल्या. ट्रक त्यानां चिरडून तसाच भरधाव वेगाने निघून गेला.यामध्ये गंभीर जखमी होऊन सारिका मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव सकटे हा किरकोळ जखमी झाला. अपघाताची नोंद रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.