प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत सायकली चोरणाऱया हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील एका युवकाला सोमवारी टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या 13 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सतीश बसाप्पा तेरणी (वय 34, रा. हत्तरगी) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी, के. के. सवदत्ती, प्रभाकर भुशी, मल्लिकार्जुन पात्रोट व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. सतीशला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
रविवारी सकाळी 10 ते 10.30 यावेळेत आरपीडी क्रॉसजवळील आश्रय एम्पायरसमोर उल्हास गिरीधर कुलकर्णी (रा. पाटील गल्ली) यांनी उभी केलेली सायकल चोरण्यात आली होती. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोमवारी सतीशला अटक करून 13 सायकली जप्त करण्यात आल्या. यापूर्वी खडेबाजार पोलिसांनी त्याच्याजवळून 25 सायकली जप्त केल्या होत्या.