प्रतिनिधी / फोंडा
सरकारने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरच परप्रांतीय मजुरांची रवानगी मूळ गावी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे कुणीही वाली नसलेल्या मजुरांची सुटका सहीसलामत करण्याची जबाबदारी रिव्होल्युशनरी इंडियन या स्वयंसेवी संस्थेने घेतली आहे. मंगळवारपासून कुर्टी-फोंडा येथील क्रीडा प्रकल्पाच्या मैदानावर लॉकडाऊन काळात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची ऑनलाईन नोंदणी या संस्थेद्वारे करण्यात येत आहे.
या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी किशोर पुरोहित, मनोज जैसवाल, नितीन काडूलकर, शामसुंदर जैसवाल, राजीव झा, नितीन पालकर, संतोष कवळेकर यांनी पुढाकार घेतला आहे. अशिक्षित मजुरांना ऑनलाईन नावनोंदणी कशी करावी, याची पुरेशी माहिती नव्हती तसेच स्मार्टफोनही नव्हते. अशा परिस्थितीत अडकलेले मजूर मूळ गावी जाण्यासाठी सोमवारी पोलीस स्थानकावर जमले होते. मजुरांच्या अडचणी निवारण्यासाठी रिव्होल्युशनरी इंडियन संस्थेच्या पदाधिकाऱयांनी फोंडा पोलिसांशी संपर्क साधला होता.
याप्रकरणी फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी उपजिल्हाधिकाऱयांकडून परवानगी मिळविल्यानंतर सदर संस्थेला अडकलेल्या मजुरांची ऑनलाईन नावनोंदणी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मंगळवार दुपारपर्यंत सुमारे 150 मजुरांची नोंदणी करण्यात आली. याशिवाय 500 मजूर प्रतिक्षेत होते. येत्या दोन दिवसांच्या अवधीत अडकलेल्या मजुरांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. तसेच राज्यभरातील परप्रांतीय मजुरांना मूळ गावी जाण्यास अडचण येत असल्याने सदर संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.