मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात येणाऱया अतिमहनीय व्यक्तींचा सत्कार करताना यापूढे शाल न वापरता पारंपरिक कुणबी वस्त्र वापरले जाईल व गोव्यात तयार झालेली हस्तकला भेटवस्तू म्हणून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोंयकार्ट या मोबाईल ऍपच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून गोव्यातील सर्व पंचायत सभागृह आणि बंद पडलेल्या प्राथमिक शाळा स्थानिक व पारंपरिक उद्योजकांना प्रशिक्षण आणि उत्पादन प्रदर्शनासाठी विनामुल्य दिल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवामानिया गोवा नामक संस्थेने पुढाकार घेऊन सादर मोबाईल ऍप तयार केले आहे. गोंयकार्ट या ऍपवर महिलांना आपल्या कलाकृती विकायला मिळतील, असे दिना बार्रेटो यांनी सांगितले. यावेळी सिया शेख, कुशा नायक, मधुमती देवी, सी. एस. मोक्षा कोटियान व स्नेहा भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभात तेजश्री पै व शीतल नाईक सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
हस्तकला तयार करणाऱया महिलांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यांची उत्पादने आता गुगल प्लेवरील गोयंकार्ट या ऍपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हस्तकलापासून खाद्यपदार्थांपर्यत सर्व सामुग्री या ऍपवर उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.