तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पवयीन मुलीला दहा रुपये देतो म्हणून घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱया नराधमाला तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मेहबुबसाब बाबासाब हादीमनी (रा. बेळवडी, ता. बैलहोंगल) असे त्या शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.
शाळेला सुट्टी पडल्याने हॉस्टेलमधून घरी गेलेल्या मुलीला मेहबुबसाबने घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दोडवाड पोलीस स्थानकामध्ये मेहबुबसाब याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी भा.दं.वि. 376 आणि 4 व 8 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर येथील तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोडवाड पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी दोषारोप दाखल करण्यात आले होते.
न्यायालयात 32 साक्षी, 68 कागदपत्रे पुरावे व मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये मेहबुबसाब हा दोषी आढळल्याने त्याला 3 वर्षांचा कारावास न्यायाधीश एम. एच. अन्नयण्णावर यांनी ठोठावला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले आहे.