वृत्तसंस्था/ टोकियो
भारताची महिला गोल्फर अदिती अशोकचे ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकल्याने तिला अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. वादळी हवामानाचा अडथळा आलेल्या शेवटच्या फेरीत तिने 3 अंडर 68 गुण नोंदवले.
23 वर्षीय अदितीने एकूण 15 अंडर 269 गुण मिळविले. पण पदकासाठी ती फक्त एक स्ट्रोकने कमी पडली. शेवटच्या फेरीचा खेळ सुरू झाला तेव्हा ती एकटीच दुसऱया स्थानावर होती. त्यामुळे पदकाची आशा बळावली होती. पण अखेर तिला चौथे स्थाने मिळाल्यानंतर ती खूपच निराश झाली. ऑलिम्पिकमध्ये चौथे मिळाल्यानंतर आनंदी होणे खूपच कठीण आहे, अशी भावना तिने नंतर व्यक्त केली. तसे पाहता अदितीने गोल्फमध्ये केलेली ही कामगिरी अभूतपूर्व अशीच आहे. तिने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. सुमारे शंभर वर्षांनंतर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्फचे पुनरागमन झाले होते आणि त्या स्पर्धेत अदितीने प्रथम भाग घेत संयुक्त 41 वे स्थान मिळविले होते.
शनिवारी झालेल्या शेवटच्या फेरीत तिने 5, 6, 8, 13, 14 व्या होलमध्ये पाच बर्डीज नोंदवल्या तर 9 व 11 व्या होलमध्ये तिने दोन बोगी नोंदवल्या. या स्पर्धेत तिची आई माहेश्वरी साहायक म्हणून तिच्या सोबत होती. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असणाऱया नेल्ली कोर्डाने शेवटच्या फेरीत 2 अंडर 69 गुण नोंदवत (17 अंडर 267) सुवर्णपदक पटकावले. जपानग्नची मोने इनामी व न्यूझीलंडची लीडिया को यांनी प्रत्येकी 65 गुण मिळविले. या दोघींत नंतर कांस्यपदकासाठी प्लेऑफ लढत घेण्यात आली. त्यात इनामीने बाजी मारत रौप्यपदक पटकावले तर लीडियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ढगाळ व आर्द्र वातावरणात घेतलेल्या प्लेऑफमध्ये लीडियाने बोगी नोंदवली तर इनामीने आपली आघाडी राखत बाजी मारली. जागतिक क्रमवारीत 200 व्या स्थानावर असणाऱया अदितीने आधीच्या फेऱयांत मिळविलेली आघाडी राखत पदकाची आशा कायम ठेवली होती. पण तिच्याकडून दोन बोगीज नोंदवल्या गेल्याने याचा तिला फटका बसला आणि लीडियाने आगेकूच केली. लीडियाने अखेरच्या फेरीत तब्बल 9 बर्डीज नोंदवल्या तर फक्त तीन शॉट्सचे गुण गमविले. भारताची अन्य एक गोल्फर दीक्षा डागरला संयुक्त 50 वे स्थान मिळाले. तिने 1 अंडर 70 गुण नोंदवल्याने तिचे एकूण 6 ओव्हर 290 गुण झाले.
युवा ऑलिम्पिकमध्येही भाग घेतलेल्या अदितीच्या नावावर अनेक विक्रम नोंद आहेत. लेडीज युरोपियन टूर (एलईटी) क्वालिफाईंग स्कूलचे जेतेपद मिळविणारी ती सर्वात युवा गोल्फर असून लेडीज युरोपियन टूर जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. तिने 2016 हिरो महिला इंडियन ओपन स्पर्धा जिंकून हा बहुमान प्राप्त केला. याशिवाय तिने आणखी दोन एलईटी स्पर्धा जिंकल्या. तिने आतापर्यंत 18 मेजर स्पर्धात भाग घेतला असून असा पराक्रम करणारी ती एकमेव भारतीय गोल्फर आहे.
चौथ्या स्थानावर खुश होणे खूपच कठीण- अदिती
एखादी दुसरी स्पर्धा असती तर चौथे स्थान मिळाल्यावर अदितीने आनंद व्यक्त केला असता. पण ही ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने त्यात पदक मिळविण्यातच खरा आनंद असतो, असे तिला वाटते. या अत्यंत महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतातर्फे तिने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. ‘मी या स्पर्धेत शंभर टक्के योगदान दिले हे खरंय. पण ऑलिम्पिकमध्ये तीनच पदके देत असल्याने चौथ्या स्थानाला काही महत्त्वच नसते. अन्य एखादी स्पर्धेत चौथे स्थान मिळाल्यावर मी खुश झाले असते. पण ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळाल्यावर आनंदी होणे खूपच कठीण आहे,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या. या कामगिरीनंतर भारतात गोल्फमधील रस वाढीस लागेल आणि त्याला पाठिंबाही मिळेल, अशी आशा तिने व्यक्त केली.