प्रशांत शिरोडकर यांचे उद्गार फोंडय़ातप्रजासत्ताकदिनसाजरा
प्रतिनिधी /फोंडा
लोकशाहीची कोनशिला असलेली भारतीय राज्यघटना प्रजासत्ताकदिनी 26 जाने. 1950 रोजी अंमलात आली. घटनेने भारतीय नागरिकांना जसे विविध अधिकार दिलेले आहे आहेत, त्याचप्रमाणे कर्तव्येही सांगितलेली आहेत. आपल्या अधिकारांचा वापर करताना कर्तव्याचेही भान ठेवा, असे आवाहन फोंडय़ाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी केले.
क्रांतीमैदान फोंडा येथे शासकीय प्रजासत्ताकदिन सोहळय़ात ते बोलत होते. प्रशांत शिरोडकर यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर तिरंगा फडकावून फोंडा पोलीस पथकातर्फे मानवंदना स्वीकारली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार श्री. दलाल, फोंडय़ाचे पोलीस उपअधीक्षक सी. एल. पाटील, अग्नीशामक दलाचे विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. गोव्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी पुढे बोलताना केले. मतदान हा घटनेने दिलेला मुलभूत अधिकार असून मतदानाविषयी जागृती व कर्तव्यपूर्तीमुळे लोकशाहीचाहा उत्सव सफल होईल व लोकशाही बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण जगाच्या आज भारताकडून मोठय़ा अपेक्षा आहे. कोरोनाकाळात याची अनुभूती आली. ‘वसुदैव कुटुंबकम्’ हे भारतीय तत्त्वज्ञानच जगाला योग्य दिशा देऊ शकेल असेही ते पुढे म्हणाले. सदर सरकारी हायस्कूलच्या शिक्षकांनी राष्ट्रगीत, देशभक्तीपर समुहगीत व शेवटी वंदेमातरम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले.