अक्कलकोट प्रतिनिधी
जिल्हा परिषद ही संस्था आहे. या संस्थेत काम करणारा प्रत्येक कर्मचारी माझे साठी आदर्श आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे चांगले कामामुळेच जिल्हा परिषदेचा राज्यात गौरव होत आहे. असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट येथे लोकापुरे मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अक्कलकोट च्या वतीने जागतिक महिला दिन व मिशन वात्सल्य अंतर्गत महिला दिनाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे, उप सभापती प्रकाश हिप्परगी, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई कल्याणशेट्टी, पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, श्री यमाजी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. करजखेडी, पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक, मार्गदर्शिका मिनल गोरे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, कोरोना काळात अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका व आशा यांनी चांगले काम केले आहे. कोरोनाचे काळात राज्यपाल यांचे हस्ते झालेल्या सत्काराचे सन्मानपत्र हे आपण जिल्हा परिषदेच्या नावे घेणेत आले आहे. संस्थेत काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांनी चांगले काम केलेमुळे दोन वेळा राज्यपाल व मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत जिल्हा परिषदेचा गौरव झाला. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.