ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मूकाश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांना यश आले.
अनंतनागच्या वाघमा परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
दरम्यान, सोमवारी अनंतनागमधील खुलचोहर भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले होते.