ऑनलाईन टीम / मुंबई :
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 2892 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने येस बँकेने त्यांचे सांताक्रूझ पूर्व येथील रिलायन्स सेंटर नावाचे मुख्यालय आणि दक्षिण मुंबईतील नगिना महाल या इमारतीमधील दोन फ्लॅट ताब्यात घेतले आहेत.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने येस बँकेकडून 12 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यामधील 2892 कोटी रुपयांची परतफेड साठ दिवसात करा, अशी नोटीस बँकेने 5 मे रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला बजावली होती. मात्र, ही परतफेड करण्यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर असमर्थ ठरली. त्यामुळे 22 जुलैला येस बँकेने कर्जवसुलीसाठी सुरुवात करत त्यांचे
सांताक्रूझ पूर्व येथील रिलायन्स सेंटर नावाचे मुख्यालय आणि दोन फ्लॅट ताब्यात घेतले.
सांताक्रूझ पूर्व येथील मुख्यालयाचे क्षेत्रफळ 21,432 चौ. फूट आहे. तर नगिना महालमधील दोन फ्लॅटचे क्षेत्रफळ अनुक्रमे 1717 चौ. फूट व 4936 चौ. फूट आहे. रिलायन्स सेंटरमधूनच अनिल अंबानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे कामकाज चालत असल्याने त्यांच्यासाठी हे मुख्यालय महत्वाचे होते. मात्र, येस बँकही या कर्जामुळे अडचणीत आली होती.