कॅट लव्हर्ससाठी अत्यंत विशेष ठिकाण
जगात पाळीव प्राण्यांना पाळणाऱया लोकांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाला स्वतःच्या पाळीव प्राण्याबद्दल प्रचंड प्रेम असते. कॅट लव्हर्स देखील या शर्यतीत मागे नाहीत. मांजरांवर प्रेम करणारे अनेक लोक तर त्याला स्वतःचे अपत्य मानूनच प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशा लोकांसाठी मांजरांची साथ ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आता फ्रान्समध्ये कॅट लव्हर्ससाठी एक अत्यतं अनोखे बुक स्टोअर सुरू करण्यात आले आहे. तेथे मांजरांसोबत वेळ घालविता येतो आणि पुस्तकेही वाचता येतात.
फ्रान्सच्या एक्स-एन् प्रोव्हेंस शहरात मॉन चॅट पित्रे नावाचे एक बुक स्टोअर जून महिन्यात सुरू झाले. हे अन्य बुक स्टोअर्सप्रमाणे पुस्तकांनी भरलेले आहे, पण येथील सर्वात विशेष बाब म्हणजे या बुक स्टोअरच्या मालकाने 6 मांजरं पाळली असून ती दुकानातच राहतात.
पत्रकार दांपत्य सोलीन चावाने आणि जीन फिलित यांनी हे बुक स्टोअर सुरू केले आहे. लोकांनी बुक स्टोअरमध्ये यावे आणि निवांतपणे वाचन करावे तसेच मांजरांसोबत वेळ घालवावा अशी त्यांची इच्छा आहे. 5 महिन्यांपूर्वीच सुरू झालेले हे बुक स्टोअर फ्रान्समध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. लोक येथे पुस्तके वाचण्यापेक्षा अधिक मांजरांसाठी येतात.
मांजरांसाठीही विशेष ठिकाण
माणसांसोबत राहताना कंटाळल्यावर ही मांजरं बुक स्टोअरच्या मागे निर्माण करण्यात आलेल्या विशेष जागेत जातात, तेथे माणसांना जाण्यास मनाई आहे. स्टोअरच्या मागे मांजरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था आहे. तसेच त्यांच्यासाठी खेळणीही ठेवण्यात आल्या आहेत.