तरुण भारत संवाद
अक्कलकोट/प्रतिनिधी
श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध लेखक पानीपतकार विश्वास पाटील यांना इंदिरा गो स्वामी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुंबई येथील निवासस्थानी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते अभिनंदनपर सन्मान करण्यात आला. येत्या दोन फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुवाहाटी येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या दरवर्षी पार पडणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे निमंत्रण पानीपतकार विश्वास पाटील यांना देण्यात आले. हे आमंत्रण आनंदाने स्वीकारत स्वामींच्या नगरीत शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाला येण्यास विशेष आनंद होईल असे मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. त्यानुसार 22 फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास ते उपस्थित राहणार असून पानीपतकारांच्या उपस्थितीमुळे अक्कलकोटकराना ऐतिहासिक साहित्याची मेजवानी मिळणार आहे.
यावेळी पद्माकरमामा डिग्गे, संतोष भोसले, भाग्यश्री लखोटिया– साठे, रमेश हलसन्गी उपस्थित होते.