कोरोनाप्रकरणी तज्ञांचा इशारा : विषाणूच्या उत्पत्तीचा शोध गरजेचा
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
कोरोना विषाणू नेमका कुठून आला यासंबंधीच्या चर्चेने जगभरात पुन्हा जोर पकडला आहे आणि चिंताही वाढली आहे. विषाणूच्या उत्पत्तीच्या मुद्दय़ावरून अमेरिकेच्या दोन तज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19 च्या उत्पत्तीचा (ओरिजिन) शोध लावा, अन्यथा कोविड-26 आणि कोविड-32 महामारीसाठी तयार रहा, असे त्यांचे म्हणणे आहे.
हा इशारा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे आयुक्त राहिलेले स्कॉट गॉटलीब आणि टेक्सासच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सह-संचालक पीटर होट्स यांनी दिला आहे. गॉटलीब सध्या फायजर या औषध कंपनीच्या संचालक मंडळात सामील आहेत.
चीनने चौकशीत मदत करावी
कोविड-19 च्या ओरिजिनचा शोध लावणे आणि भविष्यात महामारींचा धोका रोखण्यात चीनच्या सरकारने जगाला मदत करावी, असे दोन्ही तज्ञांनी म्हटले आहे. चीनच्या वुहान लॅबमधून कोरोनाचा विषाणू बाहेर पडल्याच्या दाव्याला बळकटी देणाऱया माहितीत वाढ झाली आहे. तर चीने हा दावा चुकीचा ठरविणारे पुरावेही दिलेले नाहीत, असे गॉटलीब यांनी म्हटले आहे. ज्याप्रकारे कोरोना फैलावला आहे, त्याचप्रकारे भविष्यातही महामारी फैलावण्याचा धोका वाढल्याची जाणीव जगाला अद्याप नसल्याचे होट्स यांचे म्हणणे आहे.
पॉम्पियो यांच्याकडून चीन लक्ष्य
चीन भले वुहानमधून विषाणू फैलावल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हणत असला तरीही यासंबंधीचे पुरावे वाढू लागले आहेत. अमेरिकेचे माजी विदेशमंत्री माइक पॉम्पियो यांनी चीनच्या सैन्याशी संबंधित कारवायांमध्ये वुहान लॅब सामील असल्याचा दावा केला आहे. लॅबमध्ये सैन्याशी संबंधित कामे केली जात होती आणि त्यांना नागरी संशोधन ठरविण्यात येत होते. चीनने यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेलाही माहिती देण्यास नकार दिला होता, असे पॉम्पियो यांनी म्हटले आहे.