पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफचे प्रतिपादन
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
‘सेहवाग अशा कालावधीत खेळला, ज्यावेळी भारतीय फलंदाजी सर्वाधिक भक्कम होती. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे जागतिक दर्जाचे अव्वल फलंदाज संघात होते. सेहवागने यानंतरही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. पण, हाच सेहवाग अगदी दुसऱया कोणत्या संघातून खेळला असता तरी त्याने 10 हजारपेक्षा अधिक धावा सहज फटकावल्या असत्या’, असे प्रतिपादन पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफने केले. ‘कॉट बिहाईंड’ या युटय़ूब शोमध्ये लतिफ बोलत होता.
सेहवागने आपल्या कारकिर्दीत ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, वासिम अक्रम, शोएब अख्तरसारख्या भेदक गोलंदाजांचाही सहज समाचार घेतला. अर्थात, त्याला नेहमी सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांच्या छत्रछायेखाली खेळावे लागले. सचिन, द्रविड हे दिग्गज फलंदाज असल्याने सेहवागच्या वाटय़ाला हवा तो सन्मान कदाचित आला नाही. पण, त्या पार्श्वभूमीवर लतिफने सदर वक्तव्य केले.
‘सेहवाग नेहमी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशानेच प्रत्येक चेंडू खेळायचा. वास्तविक, सलामी फलंदाज प्रारंभी खेळपट्टीचा, प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा अंदाज घेण्यासाठी थोडाफार वेळ घेतात. पण, सेहवागची शैली अशी वेळखाऊ स्वरुपाची अजिबात नव्हती. समोरचा गोलंदाज कोणीही असो, पहिल्या चेंडूपासूनच तुटून पडायचे, हा त्याचा खाक्याच होता’, असे लतिफ पुढे म्हणाला. बडय़ा खेळाडूंच्या छत्रछायेत खेळावे लागले नसते तर त्याने अधिक धावा केल्या असत्या, असे पाकिस्तानतर्फे 37 कसोटी व 166 वनडेत सहभागी झालेल्या लतिफने येथे नमूद केले.
‘भारतीय संघात भले अगदी दिग्गज फलंदाजांचा समावेश असेल. पण, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सेहवागचीच अधिक धास्ती असायची. सेहवाग आपल्यावर तुटून पडण्यापूर्वी त्याच्याकडून एखादी चूक होईल का, यावर त्यांचे लक्ष असायचे’, याचाही लतिफने येथे उल्लेख केला.
‘सेहवागचे फूटवर्क खास नव्हते, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. बॅकफूट पंच, कट, पूल मारताना त्याची सहजता दिसून यायची. त्याचे तंत्र अतिशय मजबूत राहिले. सिडनी कसाटीत याचमुळे ब्रेट ली थर्डमॅन व डीप पॉईंटवर क्षेत्ररक्षक लावून गोलंदाजी करत होता. सेहवागचे फूटवर्क बरे नव्हते, असे लोक म्हणतात. पण, माझ्यामते हेच त्याचे बलस्थान होते’, असे लतिफने शेवटी नमूद केले.
कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा एकमेव भारतीय फलंदाज असणाऱया सेहवागने 104 कसोटीत 49.34 ची सरासरी व 23 शतकांसह 8586 धावा केल्या. याशिवाय, 251 वनडे सामन्यात 8273 धावा त्याच्या खात्यावर आहेत. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱया विरुने पाकिस्तानविरुद्ध 9 कसोटी सामन्यातच 4 शतके, त्रिशतक, 91.14 च्या सरासरीसह तब्बल 1276 धावांची आतषबाजी केली आहे.
सेहवागच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप
स्पर्धा / कसोटी / वनडे / प्रथमश्रेणी / लिस्ट ए
सामने / 104 / 251 / 194 / 332
धावा / 8586 / 8273 / 14683 / 10454
सरासरी / 49.34 / 35.05 / 47.36 / 34.05
शतके-अर्धशतके / 23-32 / 15-38 / 42-55 / 16-57
सर्वोच्च / 319 / 219 / 319 / 219