आयसीएमआरकडून नवी मार्गदर्शक तत्वे- बाधिताची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी नको
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधितांसह चाचण्याही वाढत आहेत. चाचण्या करवून घेणाऱया लोकांची संख्या वाढत असल्याने देशभरातील लॅब्सवरील ताणही वाढू लागला आहे. ही स्थिती ओळखून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना चाचण्यासंबंधी नवी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत.
आयसीएमआरने लॅब्सवरील ताण कमी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचण्या कमी करणे आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या वाढविण्याची सूचना केली आहे. संक्रमणाच्या दुसऱया लाटेत चाचण्यांच्या केंद्रांवर मोठा दबाव आहे. अशा स्थितीत चाचण्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यास त्रास होतोय. लॅबचे कर्मचारीही सातत्याने संक्रमित होत असल्याचे आयसीएमआरचे म्हणणे आहे.
रॅपिड अँटीजेन टेस्टला प्रोत्साहन देण्यात यावे. सध्या या चाचण्यांचा वापर कमी करण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन किंवा काही आरोग्य केंद्रांमध्येच याचा वापर होत आहे. या प्रकारच्या चाचणीतून केवळ 20 मिनिटांत कोरोना संक्रमणाचा थांगपत्ता लागतो, याचा वापर वाढविल्यास लॅब्सवरील दबाव कमी होणार असल्याच्s आयसीएमआरने नमूद केले आहे.
आयसीएमआरच्या सूचना
-एकदा पॉझिटिव्ह आढळलेल्या कुठल्याही व्यक्तीची पुन्हा आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करू नये.
-कोरोना संक्रमणातून बरे होणाऱया रुग्णाला डिस्चार्जवेळी चाचणी अनिवार्य आहे.
-तंदुरुस्त व्यक्ती आंतरराज्य प्रवास करत असल्यास त्याच्यावर चाचणीची सक्ती नको, यातून लॅबवरील दबाव कमी होईल.
-कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, यातून संक्रमण कमी फैलावणार आहे.
-कोरोनाची लक्षणे नसलेल्या लोकांनीही प्रवासादरम्यान कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
-राज्यांनी मोबाईल सिस्टीमच्या माध्यमातून आरटी-पीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर द्यायला हवा.
प्रतिदिन 15 लाख चाचण्यांची क्षमता
भारतात चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच मृत्यू देखील अधिक होत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयसोलेशन आणि होम बेस्ड ट्रीटमेंटवर लक्ष देणे गरजेचे आहे. भारतात सध्या 2506 मॉलिक्यूलर टेस्टिंग लॅबोरेटरी आहेत. यात अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जात शकतात. या सर्वांमध्ये मिळून भारतात प्रतिदिन 15 लाख चाचण्या करण्याची क्षमता आहे.
रॅपिड टेस्टवर आयसीएमआर म्हणाले….
-शहरे आणि नागरी वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी बूथची व्यवस्था करण्यात यावी.
-या बूथ्समध्ये आठवडय़ातील सातही दिवस आणि 24 तास चाचण्या करण्यात याव्यात.
-शाळा-महाविद्यालये आणि सामुदायिक केंद्रांमध्येही रॅपिड अँटीजेन चाचण्यांची व्यवस्था केली जावी.
-खासगी आणि शासकीय आरोग्य सुविधेत रॅपिड अँटीजेन चाचण्यांना सामील करण्यात यावे.