सावंतवाडी:
सावंतवाडी-मळगाव मार्गावरील माजगाव पंचमनगर येथे दोन दिवसांपूर्वी दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी महाविद्यालयीन विद्यार्थी किरण कल्लाप्पा परीट (21, रा. माजगाव-मेटवाडा) याचे रविवारी पहाटे उपचारादरम्यान गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले. रविवारी सायंकाळी माजगाव येथे त्याच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले. किरण याच्या आकस्मिक जाण्याने मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले.
किरण हा दुचाकीने शुक्रवारी सकाळी 11.15 च्या सुमारास सावंतवाडी येथील जे. बी. नाईक महाविद्यालयात जात होता. माजगाव-पंचमनगर येथे त्याची दुचाकी अचानक घसरून तो रस्त्यावर फेकला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. डोक्यावर इजा पोहोचली त्या ठिकाणी
शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचाराला साथ मिळत नव्हती. अखेर रविवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृतदेह सायंकाळी माजगाव येथे आणण्यात आला.
किरण परीट हा मूळचा खानापूर येथील रहिवासी. त्याचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून गवंडी कामानिमित्त माजगाव येथे भाडय़ाने राहतात. आई-वडील मजुरी करून दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देत होते. मात्र, किरण याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. किरण हा एकुलता मुलगा होता. त्याने माजगाव हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. सध्या तो सावंतवाडीतील जे. बी. नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष कॉमर्समध्ये शिक्षण घेत होता. तो हुशार होता. त्याला क्रिकेटची आवड होती. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख होती. मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे.