प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर जुन्या विसर्जन तलावावर सकाळी 9 वाजल्यापासूनच गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी सकाळीच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. घरगुती गणेशमूर्तींचे दुपारपर्यंत मोठय़ा प्रमाणात विसर्जन करण्यात आले. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सकाळी गणरायाला निरोप देवून त्यानंतर सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाविक विसर्जन तलावावर दाखल होत होते.
प्रशासनाने केलेल्या आवाहनाप्रमाणे काही मंडळांनी सकाळीच गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या. मागील वषीप्रमाणेच या वषीही भातकांडे गल्लीने प्रथम विसर्जन केले. त्यानंतर बापटगल्ली येथील नवहिंद युवकमंडळ, लक्ष्मीटेकडी कॅम्प येथील मिलिटरी इंजिनियरिंग सर्व्हिसेसच्या मंडळाने कपिलेश्वर येथील नव्या तलावात विसर्जन केले. या पाठोपाठ नवीन विसर्जन तलावावर दर्गा रोड माळीगल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले.
भातकांडे गल्ली मंडळाचे महापालिकेने मानले आभार
प्रशासनाने लवकरात लवकर विसर्जन करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते. याची जाणीव ठेवत मागील वषीप्रमाणे यावषीही भातकांडे गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने प्रथम गणेशमूर्तीचे विसर्जन केले. सकाळी 10.30 च्या सुमारास जुन्या कपिलेश्वर विसर्जन तलावावर विसर्जन करण्यात आले. वेळेत गणेशमूर्तीचे विसर्जन केल्याबद्दल मनपातर्फे मंडळाचे आभार मानण्यात आले.
बसवाणेप्पा बॅण्डने आली रंगत
दर्गा रोड माळी गल्ली या मंडळाने बॅण्डच्या तालावर गणरायाला निरोप दिला. बेळगावमधील प्रसिद्ध बसवाणेप्पा बॅण्डने अप्रतिम अशा सादर केलेल्या गणरायाच्या गीतांमुळे विसर्जन मार्गावर भाविकांची वाहवा मिळविली. कपिलेश्वर तलावानजीक झिंगाट गीतावर गणेशभक्तही थिरकले. बसवाणेप्पा बॅण्डमुळे परिसरात एक वेगळेच वातावरण तयार झाले होते.
सुलभ पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी महानगरपालिकेचे नियोजन ः
बेळगावच्या सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे सुलभ पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. विसर्जनादरम्यान भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. लवकर विसर्जन करण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱयांना आवाहन करण्यात आले असून, लवकरात लवकर विसर्जन होईल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे मनपा आयुक्त रूदेश घाळी यांनी सांगितले
पोलीस आयुक्तांची कपिलेश्वर तलावाला भेट
सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी कपिलेश्वर तलावाला सकाळी 11 च्या सुमारास भेट देवून तलावाची पाहणी केली. विसर्जनादरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये, भाविकांची गर्दी होऊ नये, याकरिता आवश्यक त्या सूचना पोलिसांना दिल्या. कपिलेश्वर येथील जुन्या आणि नवीन तलावाची पाहणी केली. यावेळी महानगरपालिकेच्या शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती दिली. यावेळी वरि÷ पोलीस अधिकारी मनपा कर्मचारी उपस्थित होते.
विसर्जन काळात मदतीची हाक
शहापूर येथील सर्वम बाळेकुंद्री हा चिमुकला एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्याला 16 कोटी रुपये किमतीच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाधिक रक्कम जमा व्हावी या उद्देशाने लक्ष्मीरोड शहापूर येथील महा गणपती युवक मंडळाने विसर्जन काळातही मदतीची हाक दिली. या मंडळाने गणेशमूर्तीच्या मागे लावलेल्या बॅनरवर मदतीचे आवाहन केले. त्यामुळे विसर्जन काळातही मंडळांनी सामाजिक भान जपल्याचे दिसून आले.
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाने यावषीही आपली पारंपरिक पद्धत जपली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच गणरायाचे विसर्जन करण्यात आले. सकाळी 10 वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झाली. कपिलेश्वर जुना व नवा तलाव, जक्कीनहोंड, अनगोळ, मजगाव, जुनेबेळगाव, किल्ला तलाव, कणबर्गी तलाव या विसर्जन तलावांवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले.
पोलिसांनी भाविकांना हुसकावले
सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी कपिलेश्वर नव्या तलावावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी महानगरपालिका व पोलिसांनी भाविकांना हुसकावून लावले. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी सर्वच भाविकांना विसर्जन तलावातून बाहेर काढल्याने तलाव पूर्णपणे मोकळा झाला होता. यामुळे पोलीस व गणेशभक्तांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले. तलावावरील गर्दी कमी झाल्यामुळे संपूर्ण तलावाची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतरही पोलिसांना न जुमानता विसर्जन तलावावर भाविक दाखल होतच होते.
…अखेर डॉल्बी दणाणलीच
कोरोनामुळे यावषी केवळ मंडळाच्या 5 ते 10 कार्यकर्त्यांना मूर्तीसमवेत विसर्जनाला परवानगी देण्यात आली होती. तसेच रात्री 9 च्या अगोदर विसर्जन आटोपण्यास सांगण्यात आले होते. परंतु, रात्री दहा वाजता शहरातील अनेक मंडळांनी डॉल्बी लावली. यामुळे शहरात डॉल्बीचा दणदणाट ऐकू आला. डॉल्बीवर थिरकणारे तरुण पुढे सरकत नसल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत होती. परवानगी नसतानाही मंडळांनी डॉल्बी कशी लावली? असा प्रश्न जाणकार विचारत होते.
कोरोनाचे गांभीर्य हरवले
लहान मुलांना विसर्जन तलावावर न आणण्याची सूचना महानगरपालिकेकडून वारंवार करण्यात येत होती. तरीही हौशी भाविक आपल्यासोबत चिमुकल्यांना घेऊन गर्दी घुसत होते. त्यामुळे अशा लोकांना कोरोनाचे गांभीर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित होत होता. महानगरपालिकेच्यावतीने 200 रुपये दंड आकारला जाईल, असे सांगूनही त्याला भाविक जुमानत नसल्याचे एकूणच चित्र दिसून आले. त्यामुळे स्वतःच्या जीवापेक्षा हौस मोठी ठरल्याचे स्पष्ट झाले.
स्वच्छता कर्मचाऱयांची कार्यतत्परता
विसर्जन तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करताना तिच्यासोबत पूजेच्या वस्तू आणि निर्माल्यचेही विसर्जन करण्यात येत होते. यामुळे तलावातील पाणी गढूळ बनू नये यासाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांनी कमालीची तत्परता ठेवली होती. पाण्यात निर्माल्य पडताच त्याची ते तातडीने उचल करत होते. त्यामुळे पुढील गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सोयीचे ठरत होते. स्वच्छता कर्मचाऱयांची ही तत्परता वाखाणण्याजोगी होती.
विसर्जनाला 4 तर सेल्फीसाठी 40
विसर्जनासाठी दाखल होणाऱया भाविकांपेक्षा फोटो व सेल्फी घेणाऱयांचीच संख्या अधिक होती. विसर्जन होत आहे याचे भान हरपलेले फोटोशूटमध्ये दंग होते. त्यामुळे विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरणारे चार जण तर त्याचे फोटो घेण्यासाठी 40 जण अशी परिस्थिती विसर्जन तलावावर पहायला मिळाली. यामुळे बिनकामाच्या लोकांची गर्दी झाल्याने श्रीमूर्ती विसर्जनासही विलंब लागत होता.
…मराठीला सारले बाजूला
निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी मराठीची तळी उचलून धरली होती. परंतु, निवडणुका होऊन पंधरा दिवस होण्यापूर्वीच महानगरपालिकेच्या बॅनरवरून मराठीला बाजूला सारण्यात आले. प्रतिवषी विसर्जनासाठी लावलेल्या बॅनरवर कन्नडसोबत मराठीत भाविकांचे स्वागत करणारा मजकूर असायचा. यावर्षी मात्र तो बॅनर पूर्णपणे कन्नडमध्ये रंगविण्यात आला होता. याचसोबत विसर्जन तलावामध्ये कोणीही उतरू नये, अशा लावण्यात आलेल्या सूचनादेखील इंग्रजी, कन्नड व हिंदी भाषेत झळकत होत्या. मग मराठीवरच अन्याय का? असा प्रश्न मराठी भाषिक उपस्थित करत होते.