ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेल्या कोवॅक्सिन लसीचे 10 लाख डोस भारताकडून अफगाणिस्तानला पाठविण्यात येणार आहेत. अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हाती आल्यानंतर पहिल्यांदाच भारत ही लसीची खेप पाठवत आहे.
पहिल्या शिपमेंटमध्ये कोवॅक्सिनचे 5 लाख डोस पाठविण्यात येणार आहेत. इराणच्या ग्रेट एअरवेजच्या विमानांनी ते अफगाणिस्तानात रवाना केले असून, आज ही लस काबुलमध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरी शिपमेंट जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात पाठविण्याची योजना आहे. या शिपमेंटमध्ये उर्वरित 5 लाख डोस पाठविण्यात येणार आहेत.
भारत सरकारच्या मैत्री अभियानांतर्गत ही लस अफगाणिस्तानात पाठवली जात आहे. अल्प उत्पन्न आणि विकसनशील देशांना या मैत्री अभियानांतर्गत लस भेट म्हणून पाठवल्या जातात. भारताने यापूर्वी बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, भूतान, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव, ब्राझील, मोरोक्को दक्षिण आफ्रिका, कांगो आणि नायजेरियाला लस पाठवली आहे.