ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानमध्ये एका वरिष्ठ तालिबानी नेत्याची हत्या करण्यात आली आहे. हमदुल्लाह मुखलीस असे या तालिबानी नेत्याचे नाव आहे. तो कट्टरतावादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सदस्य होता. त्याची बादरी स्पेशल फोर्सेसमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात मुखलीस मारला गेला असून, या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.
मंगळवारी सरदार मोहम्मद दाऊद खान लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एक आणि दुसरा स्फोट रुग्णालयाच्या परिसरातच झाला. या स्फोटातील मृतांची संख्या 25 पर्यंत पोहचली आहे. तर 50 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हमदुल्लाह मुखलीस याचाही समावेश आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याची हत्या झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्विकारली आहे.