राष्ट्रपती भवनानजीकच हल्ला – ईदच्या नमाजावेळी घडला प्रकार
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात ईदच्या नमाजादरम्यान रॉकेट हल्ला झाला आहे. काबूलमधील हल्ल्याचे ठिकाण अध्यक्षांच्या निवासस्थानापासून अत्यंत नजीक आहे. याचमुळे अध्यक्ष अशरफ गनी यांना लक्ष्य करतच हा हल्ला घडवून आणला गेल्याचे मानले जात आहे. नमाजादरम्यान मोठय़ा संख्येत लोक काबूलमधील एका मैदानात एकत्र आले होते, तेव्हाच एका मागोमाग एक रॉकेट तेथे कोसळले. हे रॉकेट्स परवान-ए-सी भागातून डागण्यात आले होते. हे रॉकेट्स काबूलच्या बाग-ए-अली आणि चमन-ए-होजोरी भागात तसेच मनाबे बाशरी भागात हे कोसळले आहेत.
अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये 16 जुलै रोजी तालिबान्यांच्या हल्ल्यात भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. स्पिन बोल्डक जिल्हय़ात दानिश युद्धस्थितीचे वृत्तांकन करत होते. पाकिस्तानचे 10 हजार दहशतवादी तालिबानच्या बाजूने अफगाणिस्तानात लढत आहेत. भारताने तेथे निर्माण केलेले प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आयएसआयने या दहशतवाद्यांना सोपविली आहे.
सुमारे 20 वर्षे अफगाणिस्तानात तळ ठोकल्यावर अमेरिकेचे सैन्य माघारी परतले आहे. अमेरिकेच्या सैन्य तुकडय़ा परतू लागल्यावर तालिबानने डोकं वर काढले आहे. तालिबान पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानच्या भूमीवर कब्जा करत आहे.