वृत्तसंस्था/नॉर्थ साऊंड, अँटिग्वा
यू-19 विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघ विंडीजमध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे आयसीसीला या स्पर्धेच्या वेळापत्रकात अल्पसा बदल करावा लागला होता. पण या संघाने अप्रतिम कामगिरी करून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची कामगिरी केली. त्यामुळे आयसीसीला करावा लागलेला बदल त्यांनी सार्थकी लावला, असेच म्हणावे लागेल. मंगळवारी अफगाणचा सुपरलीग उपांत्य सामन्या इंग्लंडशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून बुधवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे.
अफगाणला देशामध्ये अनेक अडचणींना, समस्येला सामोरे जावे लागत असल्याने ते तावून सुलाखून निघालेले आहेत. अशा स्थितीत क्रिकेट हा खेळ त्यांच्यासाठी नेहमीच बामचे काम करीत आला आहे. या पार्श्वभूमीवर हा संघ येथील स्पर्धेत नवा इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. साखळी फेरीत चमकदार प्रदर्शन केल्यानंतर आता त्यांना येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी हा सामना जिंकला तर ते नवा इतिहास निर्माण करतील. त्यांनी आजवर एकदाही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नाही.
व्हिसाची अडचण निर्माण झाल्यामुळे अफगाण संघाला विंडीजमध्ये दाखल होण्यास उशीर झाला होता. पण साखळी फेरीतही त्यांनी संघर्ष करीतच शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लंकेविरुद्ध फक्त 134 धावा जमविल्या तेव्हा त्यांचे आव्हान येथेच संपुष्टात येणार असे मानले जात होते. पण अफगाण संघाने शानदार प्रदर्शन करीत लंकेला 46 षटकांत 130 धावांत गुंडाळून 6 धावांनी विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. त्याआधी त्यांनी साखळी फेरीतीतील तीनही सामने जिंकले होते. सुपरलीग उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची ही दुसरे वेळ आहे. याआधी 2018 मध्ये न्यूझीलंडमध्ये त्यांनी पहिल्यांदा असा पराक्रम केला होता. मात्र इंग्लंड संघ हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला फलंदाजीतील खोलीबद्दल ओळखले जाते. विशेषतः जेकब बेथेल अफगाणच्या गोलंदाजांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी द.आफ्रिकेविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात या अष्टपैलू फलंदाजाने आपली क्षमता दाखवून देताना केवळ 42 चेंडूत 209.52 च्या स्ट्राईकरेटने 88 धावा झोडपल्या. इंग्लंडतर्फे या स्पर्धेत नेंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. बेथेलचा जन्म बार्बाडोसमध्येच झाला असून सर गॅरी सोबर्स हे त्याचे आदर्श आहेत. येथील चार डावात त्याने 50.25 च्या सरासरीने व 112.92 च्या स्ट्राईकरेटने दोन अर्धशतकांसह 201 धावा फटकावल्या आहेत. त्याचा हाच फॉर्म अफगाणविरुद्धही कायम राहील, अशी अपेक्षा त्याचा संघ करीत आहे. असे असले तरी इंग्लंड संघात चमक दाखवू शकतील, असे अन्य काही फलंदाजही आहेत. त्यामुळे अफगाणवर विजय मिळवून अंतिम फेरी गाठणे, हेच त्यांचे लक्ष्य असेल.