तालिबानने केवळ 10 दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. 15 ऑगस्ट रोजी काबूल शहरावर कब्जा केल्यावर अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आता निश्चित झाली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांच्या या वेगवान यशामुळे जगभरातील सुरक्षा विश्लेषक चिंतेत पडले आहेत. तालिबानने अनेक जिल्हे आणि शहरांवर एकही गोळी न झाडता कब्जा केला आहे. तालिबानने 6 ऑगस्ट रोजी इराणच्या सीमेला लागून असलेल्या जरांज शहरावर कब्जा केला होता. तालिबानच्या नियंत्रणात येणारी ही पहिली प्रांतीय राजधानी ठरली होती.
अफगाणिस्तानच्या सैन्याकडे अत्याधुनिक शस्त्रs होते आणि सैनिकांना उच्चदर्जाचे प्रशिक्षणही प्राप्त होते. पण स्थानिक लोकांचा विश्वास संपादित करण्यास सरकारला सपशेल अपयश आले. अफगाणिस्तानच्या सैन्यावर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा आरोप होत राहिला आहे. तालिबानने मागील काही वर्षांमध्ये स्थानिक स्तरावर कूटनीतिचा वापर करत लोकांना स्वतःसोबत घेण्याचा प्रयत्न केला. याचमुळे अनेक भागांमध्ये तालिबानला कुठल्याही प्रतिकाराशिवाय वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे.
दोस्तमचे सैनिक लढले
मजार-ए-शरीफमध्ये कमांडर अता नूर आणि मार्शल दोस्तमच्या संघटित दलांनी तालिबानला शनिवारी चिवट प्रतिकार केला, पण सैन्याच्या शरणागतीमुळे त्यांना जीव वाचविण्यासाठी पलायन करावे लागले. अफगाणिस्तान सैन्याची शस्त्रास्त्रs आणि हेलिकॉप्टर तसेच लढाऊ विमाने आता तालिबानच्या हाती लागली आहेत. हजारा शियाबहुल बामियान प्रांतात देखील तालिबानने एकही गोळी न झाडता विजय मिळविला आहे. याच बामियान प्रांतात 2000 साली तालिबानने ऐतिहासिक बुद्ध प्रतिमांना स्फोटाद्वारे नष्ट केले होते. बामियानमध्ये तालिबानला प्रतिकार होईल असे मानले जात होते.
काबूलमध्ये दहशतवाद्यांचा शिरकाव
काबूलमध्ये तालिबानी दहशतवादी शिरल्याची जाणीव लोकांना रविवारी सकाळी झाली. दुपार होता होता अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून जात असल्याचे आणि पूर्ण देशाची धुरा तालिबानच्या हातात जात असल्याचे स्पष्ट झाले. तालिबानकडून स्थानिक सैन्य आणि राजकीय नेत्यांना आत्मसमर्पण करणे आणि युद्धमैदान सोडण्याचा इशारा देण्यात येत होता. अफगाण सैन्याबद्दल अत्यंत संवेदनशील माहिती तालिबानला मिळत होती, असेही आता स्पष्ट झाले आहे. सैन्याचा धीर खचण्यामागे अमेरिकेची भूमिकाच कारणीभूत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. तालिबानने कतारमध्ये 2020 साली झालेल्या करारातील अटींचे पालन केलेले नाही. तरीही अमेरिका अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला.
विशेष दलांवरच भरवसा
अमेरिकेने काही महिन्यांमध्येच तालिबानला सत्तेवरून हटविले होते. तालिबान आता संपेल अशी लोकांची तेव्हा धारणा झाली होती. पण तालिबान अफगाणिस्तानातून पूर्णपणे कधीच संपले नव्हते. अफगाणिस्तानात नाटो आणि अमेरिकेचे सैन्य यशाच्या शिखरावर असतानाही तालिबानचे अस्तित्व पूर्णपणे समाप्त झाले नव्हते. अफगाणिस्तान सरकार स्थानिक स्तरावर एक सक्षम सैन्य आणि पोलीस दल उभे करण्यास अपयशी ठरल्याने तालिबान पुन्हा शिरजोर झाला आहे. अफगाण सरकार शहरांच्या सुरक्षेसाठी केवळ स्पेशल फोर्सेसवर अवलंबून होते अणि ही मोठी चूक ठरली आहे.