क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
पणजी फुटबॉलर्स संघाचा एकमेव गोलाने पराभव करून चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजय नोंदविला. जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आलेल्या या लढतीतील निकालाने चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लबला 3 गुण प्राप्त झाले.
सामन्याच्या 27व्या मिनिटाला अफदालने चर्चिल ब्रदर्सच्या विजयी गोलची नोंद केली. सामन्यातील पहिली धोकादायक चाल पणजी फुटबॉलर्सने रचली. यावेळी त्यांच्या जॉयसन गावकरचा क्रॉस अन्य पणजी फुटबॉलर्सच्या खेळाडूंकडे जाण्यापूर्वी चर्चिलच्या असिफने बाहेर लाथाडला. त्यानंतर 13व्या मिनिटाला पणजी फुटबॉलर्सच्या पांडुरंगचा गोल करण्याचा यत्न चर्चिल गोलरक्षक नॉरा फर्नांडिसने अडविला.
त्यानंतर चर्चिलच्या अफदालचा गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला. लगेच या आक्रमणानंतर चर्चिल ब्रदर्सने गोल करून आघाडी मिळविली. सौरवच्या पासवर पुष्करने उजव्या बगलेतून केलेल्या क्रॉसवर एका जबरदस्त हेडरवर अफदालने हेडरवर पणजी फुटबॉलर्सच्या गोलरक्षकाला चकविले आणि चेंडू जाळीत सारला. पणजी फुटबॉलर्ससाठी आपला पहिलाच सामना खेळणारा गोलरक्षक ज्यो बॅन्सने संघासाठी अप्रतिम गोलरक्षण करताना चर्चिल ब्रदर्सचे कित्येक फटके अडविले.
दुसऱया सत्रात आरंभालाच बॅन्सने चर्चिलच्या शुबर्टचा अगदी जवळून फटका अडविला. लगेच अफदाल आणि शुबर्ट यांनी संयुक्तपणे रचलेल्या चालीवर पुष्करने हाणलेला फटका ज्यो बॅन्सने तत्परतेने अडविला आणि संघावर होणारा संभाव्य गोल वाचविला.