- ‘रामायण’ सिरीयलमध्ये साकारली होती श्रीरामांची भूमिका
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रामानंद सागर निर्मित प्रसिद्ध टीव्ही सिरियल ‘रामायण’मध्ये श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोविल यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मनाला जात आहे.
रामानंद सागर यांनी निर्मित केलेल्या रामायणात गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे देशातील कोट्यवधी हिंदूंसोबत गोविल यांच्याशी भावनिक नाते आहे. आरुण गोविल यांच्या प्रवेशामुळे भाजपला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मालिकेत सीताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला. त्यांनी रामायण व्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘विक्रम और बेताल’, ‘लव कुश’, ‘बुद्ध’ अशा मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘पहेली’, ‘सावन’ सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.