प्रतिनिधी / बेळगाव
चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यासतर्फे पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेत बेळगावच्या वाङ्मय चर्चा मंडळ संघाला 3 पारितोषिके प्राप्त झाली आहेत. मंडळाने आशा रतनजी लिखित वचनपूर्ती ही कथा सादर केली. या संहिता लेखनासाठी आशा रतनजी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. अक्षता पिळणकर यांना वाचिक अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर प्रेक्षक पसंतीचे तिसरे पारितोषिक संघाला मिळाले. या संघात जयवंत साळुंखे, अभिजित देशपांडे, अक्षता पिळणकर, असावरी भोकरे, व योगेश रामदास यांचा सहभाग होता. दिग्दर्शन असावरी भोकरे यांचे होते. चलचित्रण संकेत कुलकर्णी यांनी केले. वाङ्मय चर्चा मंडळाचे कै. अशोक याळगी तसेच नीता कुलकर्णी व गुरु पेडणेकर यांचे साहाय्य लाभले. परीक्षक म्हणून इला भाटे, प्रतिभा देशपांडे व विपुल महागावकर यांनी काम पाहिले.