बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग ऍकॅडमीचा विद्यार्थी अभिषेक नवले याने स्केटिंगमध्ये ऑस्टेलियन युवकाचा विश्वविक्रम मोडला आहे. त्याने अवघ्या 12.85 सेकंदांमध्ये 100 मीटर स्केटिंगचा विक्रम केला आहे. बुधवारी रामतीर्थनगर येथे त्याने हा विक्रम प्रस्तापित केला आहे.
यापूर्वी ऑस्टेलियाच्या युवकाने 13.24 सेकंदांमध्ये हा विक्रम केला होता. अभिषेकने हे अंतर अवघ्या 12.85 सेकंदांमध्ये पूर्ण केले आहे. अभिषेक शिवबसवनगर येथील शेख कॉलेजमध्ये पीयुसी दुसऱया वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील संजय हे वायव्य परिवहन मंडळामध्ये चालक म्हणून सेवा बजावत आहेत. तर आई सुजाता या गृहिणी आहेत.
मागील 14 वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 10 व्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग, 3 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड ऍकॅडमी, 2 वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, कर्नाटक राज्य सरकारचा 2014 चा पुरस्कार असे विविध विक्रम-सन्मान त्याने घेतले आहेत. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी व स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.