जैवसुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना होणार स्पर्धा, जोकोविच, सेरेना विल्यम्स यांच्या कामगिरीकडे लक्ष
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेला सोमवारपासून येथे सुरू होत असून कोव्हिड 19 युगातील ही पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली असून प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या वर्षातील ही दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असून यानंतर फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा होणार आहे तर कोरोनामुळे विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
सुरक्षिततेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार असले तरी काही बडय़ा खेळाडूंना त्याबाबत खात्री वाटत नसल्याने त्यांनी स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. प्रेक्षकांशिवाय आणि काही बडय़ा खेळाडूंशिवाय स्पर्धा खेळविली जाणार असल्याने त्याला नेहमीचे वलय असणार नाही. मात्र 18 वे ग्रँडस्लॅम मिळविण्याच्या प्रयत्नात असणारा सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच व 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने उतरलेली अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांच्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित असणार आहे. या स्पर्धेचा विद्यमान विजेता राफेल नदाल व महिलांतील अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी यांनी माघार घेतल्याने नॅशनल टेनिस सेंटरवर त्यांची गैरहजेरी असेल. याच टेनिस सेंटरवर काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस रुग्णासाठी तात्पुरते हॉस्पिटल बनविण्यात आले होते. मात्र आर्थर ऍश स्टेडियमवर कोरोनाची जोखिम कमी करण्यासाठी पूर्णतः रिकामे ठेवले जाणार आहे. याच महामारीमुळे या वर्षीचा टेनिस हंगाम बराचसा वाया गेला आहे. त्यात विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा समावेश आहे.
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी त्यांना नियंत्रित वातावरणात ठेवले जाणार असून त्यांची वारंवार कोरोना चाचणीही घेतली जाणार आहे. स्पर्धा सुरू झाल्यानंतर एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला स्पर्धेतून बाहेर केले जाणार आहे. सर्व टेनिसपटूंना एक किंवा दोन हॉटेल्समध्ये ठेवले जाणार असून त्यांना टेनिस कोर्टवर जाण्यासाठी फक्त अर्ध्या तासाचा प्रवास करावा लागणार आहे. जोकोविच व सेरेना विल्यम्ससारख्या काही खेळाडूंना खासगी निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना पुरविल्या जाणाऱया 24 तास सुरक्षेचा खर्च खेळाडूंनाच करावा लागणार आहे. अमेरिकन टेनिस संघटनेने (यूएसटीए) या सुरक्षा पथकाची नियुक्ती केली असून खेळाडूंची सर्व माहिती ते संघटनेला पुरविणार आहेत. निवासस्थान ते टेनिस कोर्ट याव्यतिरिक्त अन्यत्र खेळाडूंना जाता येणार नाही. एखाद्या खेळाडूने लेखी परवानगीशिवाय जैवसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची हकालपट्टी करण्यात येणार आहे.
यूएस ओपन केंद्रावर येणाऱया प्रत्येकाला तापमान मापन करणे सक्तीचे असेल. याशिवाय सॅनिटायजरचा वापर करणेही सक्तीचे असेल. सोशल डिस्टन्सिंगची जाणीव करून देण्यासाठी साईन बोर्डची सुविधा करण्यात आली आहे. खेळत नसताना किंवा जेवत नसताना खेळाडूंनी मास्क वापरणे अत्यावश्यक असेल. आर्थर ऍश व लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर असणाऱया बॉल बॉईज व लाईनकॉल देणाऱया व्यक्तींना चेहऱयावर पारदर्शक आवरण लावावे लागणार आहे. बाहेरच्या अन्य कोर्टवर लाईन कॉल्सच्या व्यक्ती असणार नाहीत. त्यामुळे लाईन कॉल्सचा निर्णय घेण्यासाठी हॉक आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लॉकररूम फक्त 30 खेळाडूंपुरताच मर्यादित ठेवला जाणार असून स्पर्धकांना आंघोळ करण्याची आणि शक्य तितक्या लवकर लॉकररूममधून बाहेर पडण्याची सूचना करण्यात आली आहे.
2012 चा विजेत्या अँडी मरेने अशा स्थितीत खेळावे लागते याबाबत दुःख व्यक्त केले. मात्र स्पर्धा आयोजकांनी केलेल्या सुरक्षा नियोजनाचे त्याने कौतुक केले. येथे सुरक्षित वाटत असून स्पर्धेत खेळण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे वाटत आहे, असे तो म्हणाला.