वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
रूमानियाची जागतिक दर्जाची महिला टेनिसपटू द्वितीय मानांकित सिमोना हॅलेपने येथे 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून कोरोनाच्या भीतीने माघार घेतल्याची माहिती स्पर्धां आयोजकांनी दिली आहे.
हॅलेपने रविवारी प्राग्वे महिलांच्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. डब्ल्यूटीए टूरवरील तिचे हे 21 वे अजिंक्यपद आहे. प्राग्वेतील स्पर्धा संपल्यानंतर हॅलेपने आपण अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत कोरोनाच्या भीतीने सहभागी होणार नसल्याची घोषणा केली. या स्पर्धेसाठी आपण न्यूयॉर्कचा प्रवास करणार नसल्याचे तिने सांगितले. अमेरिकन टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱया प्रत्येक टेनिसपटूला हॅलेपने शुभेच्छा दिल्या असून ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.