अमेरिकेच्या न्यू जर्सी आणि इलिनॉईस या प्रांतांनी शिक्षणक्षेत्रात एक अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या प्रांतांमधील विद्यार्थ्यांना भारतीय वंशाच्या नागरीकांनी अमेरिकेच्या प्रगतीत किती महत्वाचे योगदान दिले आहे, याची माहिती पाठय़क्रमाचा भाग म्हणून शिकविली जाणार आहे. भारतीयांप्रमाणेच आशियायी वंशांच्या नागरीकांच्या योगदानाचीही माहिती दिली जाणार आहे.
यासंबंधी या राज्यांनी कायदाही संमत केला आहे. पाठय़क्रमाच्या एशियन-अमेरिकन हिस्ट्री‘ या विभागात हे शिक्षण दिले जाणार आहे. न्यू जर्सी प्रांताचे डेमॉक्रेटिक पक्षाचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी यासंबंधी एक आयोगाचीही स्थापना केली असून हा आयोग या संदर्भातील अभ्यासक्रम ठरविण्यात साहाय्यता करणार आहे. अमेरिकेत सध्या आशियायी नागरीकांविरोधात ‘हेट क्राईम’ (वंशवादी गुन्हे) चे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यावर हल्ले होत आहेत. अमेरिकेसाठी हे नागरीक किती महत्वाचे आहेत, याची माहिती दिल्यास हे गुन्हे कमी होतील, अशी भावना या धोरणामागे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या एका वर्षात अशा गुन्हय़ांमध्ये 75 टक्के वाढ झाल्याने हा अमेरिकेच्या अनेक प्रांतांच्या प्रशासनांसाठी चिंतेचा विषय ठरला असून त्यावर उपाय शोधले जात आहेत.
आशियायी, विशेषतः भारतीय वंशाचे नागरीक आपल्या रोजगाराच्या संधी हिरावतात अशी अमेरिकेतील नागरीकांची भावना आहे. त्यामुळे असे हल्ले होतात. ते रोखण्यासाठी दंडात्मक कारवायांप्रमाणेच प्रबोधनाचे अभियान चालविणेही तितकेच महत्वाचे आहे, असे तेथील प्रांतांच्या प्रशासनांना जाणवत आहे.