शीतयुद्धानंतर अटक झालेला पहिला पत्रकार
वृत्तसंस्था / मॉस्को
एका रशियन न्यायालयाने वॉल स्ट्रीट जर्नलचे प्रतिनिधी इवान गेर्शकोविच यांची कोठडी तीन महिन्यांसाठी वाढविली आहे. अमेरिकेचे नागरिक असलेल्या गेर्शकोविच यांना 30 ऑगस्टपर्यंत कैदेत ठेवण्याच आदेश देण्यात आला आहे. मार्च महिन्यात रशियात वृत्तांकन करताना गेर्शकोविच यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गेर्शकोविच, वॉल स्ट्रीट जर्नल आणि अमेरिकेच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. तर रशियाच्या न्यायालयात मंगळवारी झालेली सुनावणी पूर्वघोषित नव्हती. तसेच याबद्दल मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.
हेरगिरीच्या आरोपासाठी गेर्शकोविच यांच्या विरोधात कुठले पुरावे गोळा करण्यात आले आहेत याची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी देणे टाळले आहे. तर शीतयुद्धानंतर हेरगिरीच्या आरोपाखाली रशियामध्ये अटक झालेला हा पहिलाच अमेरिकन पत्रकार ठरला आहे. गेर्शकोविच यांच्या अटकेनंतर पाश्चिमात्य देशांमध्ये आक्रोश दिसून आला आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने गेर्शकोविच यांच्या अटकेला चुकीचे ठरवत त्यांच्या तत्काळ मुक्ततेची मागणी केली आहे. गेर्शकोविच यांना मॉस्को येथल लेफोर्तोवो तुरुंगात डांबण्यात आले आहे.
अमेरिकेसोबत तणाव
गेर्शकोविच यांच्या अटकेनंतर अमेरिका आणि रशियामधील तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या निर्देशानुसार गेर्शकोविच रशियात सैन्य परिसराची हेरगिरी करत होते असा आरोप रशियाकडून करण्यात आला. गेर्शकोविच यांनी अनेक गोपनीय माहिती जमविल्याचा दावा रशियाच्या यंत्रणेने केला आहे. संबंधित आरोप सिद्ध झाल्यास गेर्शकोविच यांना 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. गेर्शकोविच हे रशिया-युक्रेन युद्धाचे वृत्तांकन करत होते.
विदेश मंत्रालयाकडून मान्यता
रशियाच्या विदेश मंत्रालयाने गेर्शकोविच यांना एक पत्रकार म्हणून मान्यता दिली आहे. गेर्शकोविच यांनी स्वत:च्या अखेरच्या वृत्तअहवालात रशियाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला होता. रशियन भाषा जाणणारे गेर्शकोविच यांचे आईवडिल अमेरिकेत वास्तव्यास आहेत.