वृत्तसंस्था/ कंधार
सातत्याने चर्चा आणि तडजोडीच्या प्रयत्नानंतरही अफगाणिस्तानात हिंसाचार कमी न झाल्याने अमेरिकेने हवाई हल्ले घडवून आणले आहेत. या हल्ल्यांमध्ये तालिबानचे 90 दहशतवादी मारले गेले आहेत. अमेरिकेच्या सैन्याने या हवाई हल्ल्यांची पुष्टी दिली आहे. अमेरिका-तालिबान करारानंतरची ही पहिली मोठी कारवाई आहे.
कंधार प्रांताच्या झारी जिल्हय़ात अफगाणिस्तान सैन्याच्या एका तपासणी नाक्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्याला उधळून लावण्यासाठी अमेरिकेने हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात 90 तालिबानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे. तालिबानने कंधारच्या पंजवान, झारी, अरघरदाब आणि मेवांड जिल्हय़ांमध्ये हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर 15 भूसुरुंगे निकामी करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या सैन्याचे प्रवक्ते कर्नल सोन्नी यांनी ट्विटरवर हवाई हल्ल्यांची पुष्टी दिली आहे. दहशतवाद्यांनी झारी जिल्हय़ात अफगाण सैन्याच्या चौकीवर हल्ला केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अमेरिका-अफगाण कराराच्या अंतर्गतच करण्यात आल्याचे ते म्हणाले
तर तालिबानच्या प्रवक्त्याने 90 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त फेटाळले आहे. 29 फेब्रुवारी रोजी दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या करारानुसार अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्याचे ठरले होते, परंतु हिंसाचार सातत्याने सुरूच आहे. तर काबूलमध्ये रॉकेटने हल्ले करण्यात आले असून या हल्ल्यांची जबाबदारी कुणीच स्वीकारलेली नाही.