नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी 27 आणि 28 जुलै ला भारताचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱयात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील. ही माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली आहे. 27 जुलैला त्यांचे भारतात आगमन होईल. 28 जुलैला ते दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलणी करतील. विविध विषयांवर ही चर्चा होईल. त्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणे हा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा असेल. तसेच कोरोना उद्रेकावर नियंत्रणासाठी सहकार्याविषयीही विचारविमर्श केला जाईल. विभागीय सुरक्षा, संरक्षण सहकार्य, शस्त्रांस्त्रांचा व्यवहार आदी मुद्दय़ांवर ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका जागतिक सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा हा दौरा उपयुक्त ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.