अमेरिकन नागरिकांना दिला जपानचा प्रवास टाळण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्य परराष्ट्र खात्याने सोमवारी आपल्या नागरिकांना टोकियो ऑलिम्पिकचे यजमान असलेल्या जपानचा प्रवास न करण्याचा इशारा दिला आहे. जपानमध्ये कोव्हिड 19 महामारीचा मोठा उद्रेक झाला असल्याने संसर्गाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे जपानचा प्रवास टाळण्याची सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना केली आहे. या इशाऱयावरून अमेरिका ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. मात्र खेळाडूंवर निर्बंध घातले नसल्याने ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये आपले खेळाडू सहभागी होतील, असे अमेरिकन ऑलिम्पिक संघटनेने म्हटले आहे.
जपानमध्ये लसीकरणाची मोहीम फार संथ गतीने सुरू असल्याने अमेरिकेने त्यावर टीका केली आहे. पण आता ऑलिम्पिक स्पर्धा दोन महिन्यांवर असले असताना जपानने मास व्हॅक्सीनेशनला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जपानला प्रवास करण्याबाबत नवी नियमावली जाहीर केली. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यावरून तसेच व्यावसायिक फ्लाईट्सची उपलब्धता, अमेरिकन नागरिकांवर जपानमधील प्रवेशावर असलेले निर्बंध, तीन दिवसांत कोव्हिड चाचणीचा अहवाल मिळविण्यातील अडथळा यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
जपानची लोकसंख्या 125 दशलक्ष असून त्यापैकी फक्त दोन टक्के लोकांचे लसीकरण झालेले आहे. गेल्या फेब्रुवारीपासून त्यांनी 65 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आणि जुलै अखेरपर्यंत ते पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. याच महिन्यात ऑलिम्पिकलाही सुरुवात होणार आहे. इतर वयोगटाच्या लसीकरणाची तारीखही त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही. जपानमध्ये इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा उद्रेक कमी प्रमाणात झाला असून आतापर्यंत 12000 कोरोना बळी गेले आहेत. मात्र अलीकडे महामारीचा प्रकोप एकदम वाढला असून रुग्णांची संख्या वाढल्याने हॉस्पिटल्सवर मोठा ताण पडला आहे. याशिवाय टोकियो, ओसाका व अन्य आठ शहरात मे अखेरपर्यंत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यात आणखी तीन आठवडय़ांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जपानमधील नागरिकांचाही ऑलिम्पिक आयोजनाला तीव्र विरोध होत असून स्पर्धा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.