फेसबुक अन् ट्विटरचा दावा : रशिया चुकीची माहिती पोहोचवित असल्याचा आरोप
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
2016 नंतर 2020 मध्ये रशिया अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती फेसबुक आणि ट्विटरने दिली आहे. रशियाने बनावट खाती आणि संकेतस्थळांचे एक जाळे निर्माण केले असून ते लेफ्ट-विंग (डाव्या विचारसरणीचे) समर्थक वृत्तसंकेतस्थळांप्रमाणे दिसून येत असल्याचे समाजमाध्यम कंपन्यांनी म्हटले आहे.
चुकीची माहिती फैलावण्यासाठी रशियाकडून एक मोहीम चालविली जात आहे. या मोहिमेला इंटरनेट रिसर्च एजेन्सीच्या स्वरुपात ओळखले जाते. ही एजेन्सी डेमोक्रेटिक पार्टीकडून मतदारांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. एजेन्सीने हेच काम 4 वर्षांपूर्वी केले होते. अधिकाऱयांनुसार फेसबुक आणि ट्विटरवर याची सक्रीयता अचानक वाढल्याचे दिसून येत आहे.
2016 सारखी स्थिती नाही
इंटरनेट रिसर्च एजेन्सी 2016 मध्ये अत्यंत सक्रीय होती. फेक नेटवर्क आणि संकेतस्थळांचा सध्याचा विस्तार 2016 च्या तुलनेत खूपच कमी आहे. रशियाने या संकेतस्थळांवर मजकूर प्रसारित करण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांनाच नियुक्त केले आहे. एका रशियान संकेतस्थळाचे नाव ‘पीसडाटा’ आहे. हे संकेतस्थळ एखाद्या वृत्तसंस्थेप्रमाणे भासते. संकेतस्थळावर संपादकांची नावे आणि छायाचित्रे असली तरीही ती सर्व बनावट आहेत. तर छायाचित्रे संगणकाच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत.
अमेरिकन लेखकांची मदत
रशियन बनावट संकेतस्थळे जाहिराती देऊन अमेरिकेच्या लेखकांकडून लेख प्राप्त करत आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर एका लेखकाने आपणही पीसडाटा या रशियन संकेतस्थळासाठी लेख लिहिल्याचे सांगितले आहे. या लेखकाने जाहिरात वाचली होती. पहिल्या लेखात त्याने डेमोक्रेटिक पार्टीवर टीका केली होती. या लेखासाठी त्याला 75 डॉलर्स (साडेपाच हजार रुपये) मिळाले होते.
गुप्तचर यंत्रणांचा इशारा
रशिया आणि अन्य देश नोव्हेंबरमध्ये होणाऱया निवडणुकींवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी अनेक महिन्यांपूर्वीच दिला होता. रशियाच्या गुप्तचर यंत्रणा अमेरिकेच्या नागरिकांना समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा कट रचत आहेत. फेसबुक आणि ट्विटरनेही आता रशियाच्या हस्तक्षेपाचे ठोस पुरावे दिले आहेत.
2016 मध्ये टीकेची झोड
2016 च्या निवडणुकीदरम्यान चुकीच्या माहितीवर मोठी कारवाई न केल्याने फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही समाजमाध्यमांच्या कंपन्यांवर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर एफबीआयने रशियाच्या हस्तक्षेपाप्रकरणी दोन्ही कंपन्यांना कारवाईचा इशारा दिला होता.
पीसडाटा संकेतस्थळ
पीसडाटा हे बनावट वृत्त संकेतस्थळ अन्य एका संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहिराती देत आहे. पीसडाटाची प्रसिद्धी करण्यासाठी 13 बनावट खाती आणि दोन पेजेसही तयार करण्यात आली आहेत. या पेजला 14 हजार लोक फॉलो करतात. हे संकेतस्थळ ऑक्टोबर 2019 रोजी सर्वप्रथम सक्रीय झाले होते. मार्च 2020 मध्ये या संकेतस्थळाने स्वतःचे लेख प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला होता. संकेतस्थळावर तीन संपादकांची छायाचित्रे असून पडताळणी केली असता ती सर्व खोटी आढळून आल्याचे फेसबुक कंपनीकडून सांगण्यात आले.