इराणच्या कद्स फोर्स प्रमुखासह आठ जणांचा खात्मा : दूतावासावर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेकडून बदला
वृत्तसंस्था/ बगदाद
बगदाद विमानतळावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात इराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सोलेमानचाही मृत्यू झाला असल्याची माहिती इराकी सुरक्षा अधिकाऱयाने दिली आहे. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेसोबत तणाव निर्माण झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता. याचा बदला म्हणूनच अमेरिकेने हा हवाई हल्ला केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी इराकमध्ये झालेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असे संबोधले आहे. यात ठार झालेल्यांमध्ये अबू महदी अल मुहादिस याचा समावेश असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. मुहादिस तेहरान समर्थक इराकी सशस्त्र समुहातील शिया नेटवर्क हश्द अल शाबीचा दुसऱया क्रमांकाचा प्रमुख आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इराणवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
इराणच्या सरकारी वाहिन्यांकडून दुजोरा
मेजर जनरल कासिम सुलेमानी हा इराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख होता. शुक्रवारी सकाळी कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. त्यामध्ये कासिम सुलेमानी ठार झाले. अमेरिकेच्या हल्ल्यात सुलेमानी मारला गेल्याच्या वृत्ताला इराणच्या सरकारी वाहिन्यांनी दुजोरा दिला आहे. सुलेमानी हा पश्चिम आशियात इराणी कार्यक्रम राबविण्यात मास्टर माईंड म्हणून ओळखला जात होता. सीरियात आपले हात-पाय पसरणे, इस्रायलमध्ये रॉकेटच्या साहाय्याने हल्ला करणे यासाठी सुलेमानी याला जबाबदार ठरविण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून अमेरिका सुलेमानीचा शोध घेत होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पकडून सूचक ट्विट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला आहे. याद्वारे ट्रम्प यांनी जगाला सूचक संदेश दिला असल्याचे स्पष्ट होत आहे. कोणताही मजकूर नसलेल्या ट्विटमध्ये अमेरिकेचा राष्ट्रध्वज दिसत आहे. गेल्या वर्षापासून इराण आणि अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर अनेक बंधनेही लादली आहेत.
दूतावासावरील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर
अमेरिकेच्या इराणमधील हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. मिलिशियाने बगदादमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या कद्स फोर्सने कच्च्या तेलाच्या संदर्भात असद आणि त्याचा लेबनानी सहकारी हिजबुल्ला याचे समर्थन केल्याचा आरोप अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आला होता.
सुलेमानीच्या मृत्यूने इराणचा तीळपापड
कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर आयातुल्ला खोमेनी यांनी काही ट्विट केले आहेत. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला त्यांनी इशारा दिला आहे. खोमेनी यांनी देशामध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे. ‘सुलेमानी यांचे काम आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुन इराणची वाटचाल पुढेही सुरू राहिल. ज्या-ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे, त्यांना सोडणार नाही’’ असा निर्धार खोमेनी यांनी व्यक्त केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही अमेरिकेवर टीका केली आहे. तसेच सुलेमानी याच्या मृत्यूनंतर इराणमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. अमेरिकेने चुकीचे पाऊल उचलले असून त्यांना परिणाम भोगावे लागतील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
जगभरात तेलसंकटाची भीती ?
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभर तेलसंकट पुन्हा उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तेलाचे दर 3 डॉलर्सने वाढले तर शेअर बाजार कोसळल्याचे वृत्त आहे. बगदाद विमानतळाजवळ करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यामुळे आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे जग तिसऱया महायुद्धाच्या दिशेने निघाल्याचा ‘वर्ल्डवॉर 3’ हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होऊ लागला आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे इराणनेही बदला घेण्याचा इशारा दिला आहे. परिणामी पुढील काही दिवस आखातामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. या घटनेचे जगभर पडसाद उमटले असून भारतावरही याचा परिणाम होऊ शकतो. चाबहार बंदराच्या कामावर याचे परिणाम होऊन तेल संकट निर्माण होऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. भारताने याबाबत प्रतिक्रिया देताना दोन्ही देशांनी संयम बाळगण्याबाबत आवाहन केले आहे. रशियानेही ही घटना म्हणजे अमेरिकेचे दुःसाहस असून यामुळे त्या दोन्ही देशातील तणावाचा अन्य देशांवरही परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे. इराकने यामुळे युद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली तर फ्रान्सने दोन्ही देशांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.