गिरीष कल्लेद / बेळगाव
कोरोना महामारीचे निदान शोधण्यासाठी विविध देशांतील तज्ञमंडळी कार्यरत आहेत. अमेरिका येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ईन मेडिसिन या जगातील पाचव्या क्रमांकावर असणाऱया हॉस्पिटलमध्ये कोविड-19 वर संशोधनाचे कार्य सुरू आहे. या टीममध्ये बेळगावच्या सुपुत्राचा सहभाग आहे, ही समस्त बेळगावकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. हिंदवाडी येथील संजीव आणि भारती किल्लेकर यांचा सुपुत्र आदित्य संशोधन कार्यातील 26 जणांच्या या टीममध्ये आहे. त्याच्यासह कर्नाटकातील अन्य दोघेजण आहेत. पोलंड येथील डॉ. स्लोमका यांच्या नेतृत्वाखाली कोविड-19 चे निदान शोधण्याचे संशोधन सुरू असून दि. 23 मार्चपासून या कामास सुरुवात झाली आहे. येत्या 10 ते 15 दिवसात यशस्वी होण्याचा विश्वास आदित्यने तरुण भारत प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलताना व्यक्त केला.
संशोधन टीममध्ये तज्ञ डॉक्टरांसह क्लिनिकल्स, रेडिओलॉजिस्ट आणि इंजिनिअर्सचा समावेश आहे. टीमच्या प्रमुख दामिनी डी. याही भारतीयच आहेत. अमेरिकेसह तैवान, कोरिया, चीन, पोलंड आदी देशांतील तज्ञांचा समावेश आहे. कोविड-19 चे निदान तात्काळ व्हावे, या दृष्टीने संशोधन सुरू आहे. यासाठी संशयितांच्या छातीचे सीटीस्कॅन करून तसेच एक्सरेद्वारे निदानाचे प्रयत्न सुरू आहेत. याबरोबरच कोरोनाचा संशयित रुग्ण जवळ आल्यावर तो पॉझिटिव्ह आहे याचे निदानही होणार आहे. या संशोधनामुळे कोविड-19 चे निदान लवकर झाल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे, असे आदित्यने सांगितले.
आदित्यने एम. एस. पूर्ण केल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍण्ड मशीन लर्निंग (फेस रिकग्नायझेशन) या विषयावर पेपर प्रेझेंटेशन केले आहे. यासाठी त्याला एक वर्षाचा कालावधी लागला. इजिप्त येथील डॉ. वाहल आणि डॉ. याकोपो (इटली) यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा प्रोजेक्ट केला आहे. या प्रोजेक्टसाठी अमेरिकन सरकारने अनुदानही दिले आहे. याची दखल अमेरिकेतील प्रसिद्ध असणाऱया वॉशिंग्टन पोस्टद्वारे घेण्यात आली असून त्याची मुलाखतही प्रसिद्ध झाली आहे, असे आदित्यचे वडील संजीव किल्लेकर यांनी सांगितले. आदित्य लहानपणापासूनच हुशार आहे. येथील सेंट मेरीज शाळेत त्याचे शिक्षण झाल्यानंतर जीएसएसमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जीआयटीमधून ईएनसी केल्यानंतर बेंगळूर येथील आयबीएम या अमेरिकन कंपनीत तो 1 वर्ष होता. 2016 पासून तो अमेरिकेत आहे. एम. एस. केल्यानंतर त्याच ठिकाणी तो कार्यरत आहे. आपला मुलगा कोविड-19 वरील संशोधन कार्यात सहभागी असल्याचा अभिमान आहे. त्या ठिकाणी तो एकटाच असल्याने चिंताही वाटत असल्याचे भारती किल्लेकर यांनी सांगितले. आदित्यचा लहान भाऊ गौरव किल्लेकर याने एमबीए पूर्ण केले आहे.
सुपर जिनियस सायंटिस्ट
आदित्यची ओळख तेथील मेडिकल एच.आर.नी ‘सुपर जिनियस सायंटिस्ट’ अशी करून दिली आहे. त्याची बुद्धिमत्ता पाहून ब्रिजवायवल या अमेरिकन कंपनीने आदित्यला टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून नियुक्त केले आहे. बेळगावातील जीआयटी कॉलेजवतीने अमेरिकेतील ईएनसीबाबत आदित्यचे लेक्चरही आयोजित केले होते.