अमेरिकेच्या अध्यक्षांचे जनतेला एकजुटतेचे आवाहन- तिन्ही घटनास्थळांना दिली भेट
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेलेल्या लोकांचे स्मरण करत जनतेला एकजुटतेच्या भावनेचे आवाहन केले आहे. दहशतवाद्यांनी 4 विमानांचे अपहरण करत अमेरिकेत अत्यंत भीषण हल्ले घडवून आणले होते. या हल्ल्यांवेळी बायडेन सिनेटर होते तर आता ते कमांडर इन चीफ आहेत. विमान हल्ले झालेल्या तिन्ही ठिकाणांना अध्यक्षांनी भेट दिली आहे. ते न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागॉन आणि शांक्सविलेनजीकच्या एका शेतात गेले आहेत.
या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बायडेन यांनी कुठलेच भाषण केले नाही. तर व्हाइट हाउसने बायडेन यांचे पूर्वीच रिकॉर्ड करण्यात आलेले संबोधन प्रसिद्ध केले आहे. यात अध्यक्षांनी ‘राष्ट्रीय एकात्मतेच्या खऱया भावने’चा उल्लेख केला आहे, जी हल्ल्यांनंतर दिसून आली होती तसेच अपेक्षित असेच अनपेक्षित ठिकाणी शुरतेच्या स्वरुपात दिसून आली होती. 9/11 च्या हल्ल्यांमध्ये सुमारे 3 हजार लोक मारले गेले होते.
माझ्या दृष्टीकोनातून 11 सप्टेंबरबाबत एकता हीच आमची सर्वात मोठी शक्ती आहे हाच मुख्य धडा असल्याचे उद्गार बायडेन यांनी काढले आहेत. बायडेन यांनी शनिवारी सर्वप्रथम वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही टॉवर जमीनदोस्त झालेल्या ठिकाणाला भेट दिली आहे. या ठिकाणी आता नॅशनल सप्टेंबर 11 मेमोरियल उभारण्यात आले आहे.
त्यानंतर पेनसिल्वेनियाच्या शँक्सवेलेच्या एका शेताला त्यांनी भेट दिली आहे. या ठिकाणी विमानातील प्रवाशांनी दहशतवाद्यांना प्रतिकार केला होता, जेणेकरून विमान वॉशिंग्टनमधील दहशतवाद्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू नये. प्रवाशांनी दाखविलेल्या हिमतीमुळे हे विमान शेतात कोसळले होते. बायडेन यांनी पेंटागॉनलाही भेट दिली आहे.
भले कितीही काळ उलटला असो, पण त्या वेदनीच आठवण अशी ताजी करते जणू तुम्हाला हे वृत्त काही सेकंदांपूर्वीच मिळाली असावी असे बायडेन यांनी स्वतःच्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. 9/11 च्या हल्ल्यांना 20 वर्षे पूर्ण झाली असतानाच अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैनिकांनी माघार घेतली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवाद्यांना आश्रय दिलेली राजवट आता अफगाणिस्तानात पुन्हा परतली आहे.