मोठय़ा प्रमाणात असणारे ‘अनिर्णित’ मतदार ठरविणार भवितव्य
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अत्यंत चुरशीने लढविल्या जात असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्या, अर्थात येत्या मंगळवारी मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप आणि डेमॉपेटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे. अटीतटीची स्पर्धा असणाऱया प्रांतांकडे या दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले असून त्यांचे अनेक दौरे केले आहेत.
अमेरिकेतील साधारणतः 24 कोटी मतदारांपैकी आठ कोटींहून अधिक मतदारांनी यापूर्वीच पोस्टाद्वारे मतदान केले आहे. हा पोस्टाद्वारे मतदानाचा आजवरचा विक्रम आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या थैमानामुळे अनेकांनी प्रत्यक्ष मतदानकेंद्रांमध्ये न जाता पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय निवडल्याचे दिसून येते.
अमेरिकेतील 50 राज्ये आणि 1 जिल्हा यात एकंदर 538 जणांच्या ‘निवड वृंदा’ची (इलेक्टोरल कॉलेज) निवड लोक करतात. प्रत्येक प्रांताला विशिष्ट संख्येने निवड वृंदातील सदस्यांची निवड करावयाची असते. नंतर हे सदस्य प्रत्यक्ष अध्यक्षाची निवड करतात. ज्या प्रांतामध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या प्रांतात निवडून आलेले ‘निवड वृंद’ सदस्य त्या पक्षाच्या अध्यक्षीय प्रतिस्पर्ध्याला मतदान करतात. अशा प्रकारे ज्या प्रतिस्पर्ध्याला 270 किंवा त्यापेक्षा अधिक मते पडतात, तो नूतन अध्यक्ष बनतो, अशी अमेरिकेतील प्रथा आहे.
मतगणनेला वेळ लागणार
यावेळी पोस्टाद्वारे मतदान अधिक प्रमाणात झाल्याने मतगणनेला काही आठवडे लागू शकतात अशी स्थिती आहे. पोस्टाद्वारे झालेले मतदान एकंदर मतदानाच्या निम्म्याहून अधिक असल्याने या सर्व मतांची गणना झाल्यानंतरच अंतिम निवडणूक परिणाम घोषित होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे.