ऍस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये दुर्घटना
टेक्सास / वृत्तसंस्था
अमेरिकेतील टेक्सास येथील ऍस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत सुमारे 300 जण जखमी झाले आहेत. या महोत्सवात सुप्रसिद्ध रॅपर ट्रव्हिस स्कॉट परफॉर्म करत असताना रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. हा शो पाहण्यासाठी जवळपास 50 हजार लोक जमले होते. कार्यक्रमादरम्यान मोठा जमाव स्टेजकडे जाऊ लागल्यामुळे काही लोक घाबरले आणि धक्काबुक्की करू लागले. तसेच काही लोक पळू लागले तर काही लोक बेशुद्ध पडल्यामुळे संगीत महोत्सवात प्रचंड गोंधळ उडाला. 2019 मध्ये स्कॉट यांनी हा महोत्सव सुरू केला होता.
टेक्सासमधील या दुर्घटनेत 300 जण जखमी झाले असून त्यापैकी 23 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच 11 जणांना हृदयविकाराचा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी व्हिडीओ फुटेज पाहिले जात असल्याचे ह्यूस्टन फायर चीफ सॅम्युअल पी यांनी स्पष्ट केले आहे.