231 प्रवासी असलेल्या विमानाच्या इंजिनला आग वैमानिकाने करविले सुरक्षित लँडिंग
वृत्तसंस्था/ डेनवर
अमेरिकेत रविवारी मोठी विमान दुर्घटना टळली आहे. डेनवर येथून होनोलुलु येथे जात असलेल्या बोइंग 777 च्या इंजिनमध्ये उड्डाण केल्याच्या काही वेळातच आग लागली आहे. आगीच्या वेळी विमान 1 हजार फूटांच्या उंचीवर होते. पण वैमानिकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. वैमानिकाने त्वरित नियंत्रण कक्षाला संदेश पाठवून डेनवरमध्ये विमानाचे सुरक्षित लँडिंग करविले आहे. विमानात 231 प्रवासी आणि चालक दलाचे 10 सदस्य होते.
या घटनेच्या चौकशीसाठी नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी बोर्डाने (एनटीएसबी) समिती स्थापन केली आहे. विमानाचे काही अवशेष मोठय़ा भागात फैलावले आहेत. या अवशेषांना स्पर्श करू नका, असे आवाहन मफील्ड पोलिसांनी केले आहे.
विमानाच्या इंजिनात आग लागताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. पण वैमानिकाने त्यांचा धीर खचू दिला नाही. सुरक्षित लँडिंगसाठी प्रयत्न करत असल्याचे वैमानिकाने सांगितले. यादरम्यान एका प्रवाशाने पेटत्या इंजिनाचे चित्रण करत ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे. एकाक्षणी मरण जवळ आल्याचे वाटू लागले होते. स्फोटानंतर आम्ही सातत्याने उंचीवरून खालच्या दिशेने जात होतो. आगीमुळे विमानातील तापमानही वाढू लागले होते, असे उद्गार प्रवासी डेव्हिड डेल्युसिया यांनी काढले आहेत.
हे विमान सुमारे 26 वर्षे जुने होते आणि यात दोन प्रैट अँड व्हिटनी पीडब्ल्यू4000 इंजिन्सचा समावेश होता. फेब्रुवारी 2018 मध्येही बोइंग 777 च्या एका जुन्या विमानाचे इंजिन निकामी झाले होते. तेव्हाही कमी वेळेतच सुरक्षित लँडिंग करविण्यात आले होते.