हादरवून टाकणारी घटना – ख्रिसमस परेडवेळी घडला प्रकार ,40 जखमी
वृत्तसंस्था/वॉकेशा
अमेरिकेत ख्रिसमस परेडमध्ये एक भीतीदायक घटना घडली आहे. विस्कॉन्सिन प्रांताच्या मिल्वौकी शहरातील वॉकेशा या उपनगरात रविवारी भरधाव कार ख्रिसमस परेडमध्ये घुसली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांची तसेच जखमींची संख्या अधिक होऊ शकते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. तर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन प्रांतात लोक ख्रिसमस परेडमध्ये सामील झाले होते. सर्वत्र जल्लोष आणि आनंदाचे वातावरण असताना अचानक एक एसयुव्ही कार या परेडमधील लोकांना चिरडून निघून गेली.
दरवर्षी आयोजित होणाऱया ख्रिसमस परेडमध्ये मोठय़ा संख्येत लोकांनी भाग घेतला होता. मुलांच्या मार्चिंग बँडमध्येच ही कार शिरली होती. या घटनेनंतर सुमारे 40 जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सामूदायिक जल्लोषाच्या ठिकाणी आमच्या शहरात एक हृदयविदारक घटना घडली आहे. या जीवघेण्या घटनेबद्दल अत्यंत दुःख आहे. मृतांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. ही दहशतवादी घटना होती का दुर्घटना हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे शहराचे महापौर शान रेइली यांनी म्हटले आहे.