ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील धनीपूर गावात बाबरी मशिदीच्या आकाराचीच भव्य मशिद बांधण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि एक रुग्णालय देखील उभारण्यात येणार आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव व प्रवक्ते अथर हुसेन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मशिद आणि कॉम्प्लेक्ससाठी धनीपूर येथे 5 एकर जागा देण्याचे उत्तरप्रदेश सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने मशिदीसाठी पाच एकर जागा दिली आहे. या मशिदीच्या उभारणीसाठी इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्टची स्थापनाही करण्यात आली. तसेच मशिद आणि कॉम्प्लेक्सच्या डिझाईनचे काम जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख एम. एस.अख्तर यांच्याकडे देण्यात आले आहे.
पाच एकर जागेत मशिदीजवळ तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये एक ग्रंथालय आणि संग्रहाल देखील उभारण्यात येणार आहे. निवृत्त प्राध्यापक व अन्न समीक्षक पुष्पेश पंत हे संग्रहालयाचे अभिरक्षक असणार आहेत. प्राध्यापक अख्तर संपूर्ण पाच एकर परिसराचे डिझाईन करणार आहेत. कॉम्प्लेक्समध्ये इंडो इस्लामिक संशोधन केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.