आजपासून गोव्यात 17 मेपर्यंत पाऊस शक्य, चक्रिवादळाची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रिवादळात रूपांतर होण्याची शक्यता वाढली असून गोव्यात आज दुपारनंतर काही भागात पावसाला प्रारंभ होईल. दि. 15 ते 17 मे या दरम्यान गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समुद्राच्या दरम्यान मोठय़ा प्रमाणात पावसाळी ढग जमले असून त्यातून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हवामान खात्याच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रिवादळात रूपांतर होऊ शकते. मात्र हे चक्रिवादळ कधी निर्माण होईल आणि ते नेमके कोणत्या दिशेने वर सरकणार याबाबतची माहिती पुढील दोन दिवसात मिळेल.
या परिस्थितीमुळे केरळ, कर्नाटक व गोव्यात आज दुपारनंतर पासून पावसाची शक्यता आहे. दि. 14 रोजी पावसाचा जोर वाढेल. विजांच्या गडगडासह व जोरदार वादळीवाऱयासह गोव्यात पाऊस येऊ शकतो. दि. 15 रोजी पावसाचा जोर बऱयाच प्रमाणात वाढेल व दि. 16 मे रोजी राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.
हा मान्सूनपूर्व पाऊस असला तरी तापमानात होत जाणारे बदल त्यातून हे पावसाळी ढग अरबी समुद्रात निर्माण झालेले आहेत आणि दक्षिण पूर्व म्हणजेच भारताच्या पश्चिम किनाऱयालगतच्या साऱया परिसरात पावसाची शक्यता आहे. गोव्यात आज सायंकाळी तुरळक पाऊस पडेल. वादळी वाऱयाचा वेग 30 ते 40 कि.मी. ताशी राहिल असे म्हटले आहे. राज्यात दि. 12 मे रोजी 35.6 डि.से. असे उच्चतम तापमान होते. दि. 15 व दि. 16 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.