4 वर्षात धडकली 5 वादळे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आतापर्यंत चक्रीवादळ म्हटले की, बंगालचा उपसागर डोळय़ासमोर येतो. मात्र हे चित्र गेल्या 4 वर्षात बदलले आहे. अरबी समुद्र आता पूर्व मोसमी हंगामातील चक्रवादळाचे केंद्र बनला आहे. गेल्या 4 वर्षात या समुद्रात 5 पूर्व मोसमी चक्रीवादळे धडकल्याची माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. दरम्यान, तौक्तेनंतर येणाऱया वादळाचे नामकरण ‘यास’ असे निश्चित झाले आहे.
भारतीय उपखंडानजीकच्या समुद्रात दरवर्षी सरासरी 5 चक्रीवादळे येतात. यापैकी 4 बंगालच्या उपसागरात तर एक अरबी समुद्रात निर्माण होत असते. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान अधिक असल्याने चक्रीवादळासाठी अधिक अनुकूल वातावरण मिळते. गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमान वाढीमुळे पूर्व मोसमी हंगामात अरबी समुद्रात सातत्याने वादळाची नोंद झाली आहे. जगातल्या एकूण महासागरांचा विचार करता जलदगतीने तापमान वाढ होणाऱया समुद्रांमध्ये अरबी समुद्राचा क्रमांक वरचा आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. गेल्या 4 वर्षात एरव्ही शांत समजल्या जाणाऱया अरबी समुद्रात 5 पूर्व मोसमी चक्रीवादळांची नोंद झाल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
2014 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार हिंद महासागराचे तापमान 0.7 डिग्री सेल्सियसने वाढल्याचे स्पष्ट झाले होते. उपग्रहाने केलेल्या नोंदीनुसार 1980 मध्ये अरबी समुद्रात पहिल्यांदाच पूर्व मोसमी चक्रीवादळाची नोंद झाली. दिवसेंदिवस महासागरांचे वाढत चाललेले तापमान या विध्वंसकारी चक्रीवादळांना जन्म देत असल्याचे ते म्हणाले.
‘तौक्ते ’नंतर धडकणार ‘यास’
तौक्तेनंतर धडकणाऱया चक्रीवादळाचे नामकरण यास (ओमान) असे करण्यात आले आहे. त्यानंतर गुलाब (पाकिस्तान), शाहिन (कतार), जावाद (साउदी अरेबिया) आणि असनी (श्रीलंका) अशी पुढील चक्रीवादळांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
अरबी समुद्रातील मान्सूनपूर्व चक्रीवादळे
वर्षे वादळ कालावधी चक्रीवादळाचा प्रवास
2018 सागर 16 ते 25 मे प. अरबी समुद्र ते सोमालिया
2018 मेकूणू 21 ते 25 मे मालदीव ते ओमान
2019 वायू 10 ते 17 जून मालदीव ते गुजरात
2020 निसर्ग 1 ते 4 जून पूर्व अरबी समुद्र ते महाराष्ट्र
2021 तौक्ते 14 मे 18 मे लक्षद्वीप ते गुजरात