अमेरिकेकडून मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमेच्या स्वरुपात मान्यता
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेने भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये संमत एका प्रस्तावात अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य हिस्सा असे संबोधिण्यात आले आहे. हे विधेयक सिनेटमध्ये (वरिष्ठ सभागृह) मांडणारे खासदार बिल हॅगरटी आणि जेफ मर्क्ले यांनी चीन सातत्याने हिंद-प्रशांत क्षेत्रात धोका निर्माण करत असल्याने अमेरिकेने स्वतःचा धोरणात्मक भागीदार असलेल्या भारतासोबत उभे राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
हे विधेयक अरुणाचल प्रदेशला स्पष्ट स्वरुपात भारताचा हिस्सा म्हणून मान्यता देते. चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असून आम्ही याची निंदा करतो. आम्ही भारत आणि क्वाड देशांसोबतची अमेरिकेची भागीदारी वाढविण्याच्या मताचे आहोत, या भागीदारीच्या माध्यमातून हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करता येणार असल्याचे या खासदारांनी सांगितले आहे.
चीनच्या आगळीकीची निंदा
या प्रस्तावाद्वारे अमेरिकेने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या आगळीकींची निंदा केली आहे. चीनकडून करण्यात आलेला सैन्यबळाचा वापर, वादग्रस्त क्षेत्रात गाव वसविणे, स्थानिक शहरांना मँडरिन (चिनी भाषा)मध्ये नाव देणे आणि नकाशा प्रसिद्ध करण्याच्या कृत्याची अमेरिकेने निंदा केली आहे. तसेच भूतानमधील अनेक क्षेत्रांना चीनचा हिस्सा संबोधिणे गैर असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
भारतासोबतचे संबंध
याचबरोबर प्रस्तावात चीनकडून वाढलेल्या धोक्यांदरम्यान स्वतःच्या बचावाकरता उचलण्यात आलेल्या पावलांप्रकरणी भारत सरकारचे कौतुक करण्यात आले आहे. याचबरोबर प्रस्तावात भारत-अमेरिकेदरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच क्वाड, पूर्व आशिया परिषद आणि असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्सन (आसियान)द्वारे दोन्ही देशांदरम्यान बहुपक्षीय सहकार्य वाढविण्यात यावे असे म्हटले गेले आहे.
चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न
अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये 9 डिसेंबर 2022 रोजी भारत अणि चीनच्या सैनिकांदरम्यान झटापट झाली होती. 600 चिनी सैनिकांनी 17 हजार फुटांच्या उंचीवरील भारतीय पोस्ट हटविण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. ही बॉर्डर पेस्ट यांगत्से येथे आहे. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावून लावले होते. तवांगमध्ये झालेल्या झटापटीपूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेत स्वतःचा ड्रोन पाठविण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारतीय वायुदलाने त्वरित स्वतःची लढाऊ विमाने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर तैनात केली होती.