वृत्तसंस्था/ लंडन
अर्सेनलचा डिफेंडर डेव्हिड लुईझला एक वर्षाची मुदतवाढ मिळाली असून त्याने वाढीव करारावर स्वाक्षरी केल्याचे या प्रिमियिर लीग क्लबने बुधवारी जाहीर केले. गेल्या आठवडय़ात मँचेस्टर सिटीविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले होते.
क्लबने असेही पुढे सांगितले की, फ्लॅमेन्गो व साऊदम्प्टन यांच्याकडून लोन तत्वावर घेण्यात आलेल्या पाब्लो मारी व सेड्रिक सोआरेस यांनाही दीर्घ काळासाठी करारबद्ध केले जाणार आहे. मिडफिल्डर डॅनी सेबालोस रियल माद्रिदकडून लोनवर आला होता. त्यालाही आता मुदतवाढ मिळाली आहे. ‘आगामी काळासाठी हे सर्व खेळाडू आमच्या संघातून खेळणार आहेत, याचा मला खूप आनंद आहे,’ असे अर्सेनलचे तांत्रिक संचालक एदु यांनी सांगितले. मी व मिकेल अर्टेटा दोघांनी मिळून दीर्घ काळासाठी एक तांत्रिक योजना तयार केली आहे, हे खेळाडू त्या योजनेचा एक भाग असतील. त्यांच्यामुळे संघ समतोल होणार आहे,’ असे एदु पुढे म्हणाले. 33 वर्षीय लुईझचा करार या महिनाअखेरीस संपणार होता. स्पेनचा मारी व पोर्तुगालचा सोआरेस जुलैमध्ये ट्रान्स्फर विंडो खुला झाल्यानंतर अर्सेनलमध्ये रीतसर दाखल होतील.