आंध्रप्रदेशातील धक्कादायक घटना : समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्हय़ात ‘बालविवाहा’चे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिल्हय़ातील राजा महेंद्रवरम भागातील एका शाळेत एका विद्यार्थ्याने भरवर्गाताच स्वतःच्या प्रेयसीशी विवाह केला आहे. विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मंगळसूत्र घालून तिच्या कपाळी सिंदूरही भरला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अल्पवयीन असून अकरावीत शिकत आहेत. या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यावर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बालविवाह निषेध अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पूर्व गोदावरी जिल्हय़ातील राजा महेंद्रवरम भागातील एका शाळेत शिकतात. हे दोघेही कथितरित्या प्रियकर आणि प्रेयसी आहेत. दोघेही परस्परांशी विवाह करू इच्छित होते. मुलाचे वय 17 वर्षे आहे.
मित्रांकडून चित्रण
विद्यार्थ्याने विद्यार्थिनीसाठी बाजारातून मंगळसूत्र खरेदी करून त्याने शाळेत धाव घेतली होती. वर्गात असलेल्या त्या विद्यार्थिनीला तो मंगळसूत्र घालत असताना त्याच्या काही मित्रांनी याचे चित्रण केले होते. समाजमाध्यमांवर याची चित्रफित प्रसारित झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
महिला आयोग सक्रीय
मुलगी आणि मुलाचे समुपदेशन करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले आहे. वर्गात अल्पवयीनांचा विवाह कोणी घडवून आणला याचा तपास पोलीस करत होते. तर आंध्रप्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा वासीरेड्डी पद्मा यांनी दोघेही अकरावीत शिकत असून अल्पवयीन मुलीला आयोग आश्रय देणार असल्याचे म्हटले आहे. वर्गात अशाप्रकारे विवाह केल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांना कायद्याविषयी कमी माहिती असल्याचे आढळून आले आहे. बालविवाह, पोक्सो कायदा, शिक्षणाचा अधिकार यासंबंधी महिला आयोग महाविद्यालयांमध्ये जागरुकता मोहीम चालवत असल्याचे महिला आयोगाच्या संचालिका आर. सयूज यांनी सांगितले आहे.
शाळेतून हकालपट्टी
तर घडलेला प्रकार समजताच शाळेच्या व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची हकालपट्टी केली आहे. तर मुलीच्या आईवडिलांनी तिला घरात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. समुपदेशनासाठी मुलीला वन स्टॉप सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. महिला आयोगाच्या सदस्यांनी मुलाच्या आईवडिलांशी संपर्क साधून त्याचे समुपदेशन केले आहे.
पोलिसांकडून गुन्हा नोंद
याचदरम्यान राजामहेंद्रवरम टू टाउन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. दोन्ही अल्पवयीन, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे नोंदवून घेऊ असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.