प्रतिनिधी / ओरोस:
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दीपेश मारुती गावठे (18, रा. पांग्रड किनवणेवाडी ता. कुडाळ) याला विशेष जिल्हा न्यायाधीश प्रकाश कदम यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.
गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला त्याने सायकल दाखविण्याच्या बहाण्याने नजीकच्या गोठय़ात नेले. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच कुणाला याबाबत काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार आहे. 5 मे रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार 9 मे रोजी पहाटे कुडाळ पोलिसात दाखल झाली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितावर भा. दं. वि. कलम 376 (1), 376 (एबी), 506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली.
दुपारी त्याला ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान तो तपासकामात सहकार्य करीत नसल्याने आणि गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने असे करण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता, हे तपासणे आवश्यक असल्याने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आल्याचे ऍड. तायशेटे यांनी सांगितले.