प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुक्यातील शाहूपुरी ते कोंडवे रस्त्यावर असलेल्या स्टार केमिकल्स इंडस्ट्रीजमध्ये बिगर परवाना अमोनियम सल्फेट खत विक्री केल्याप्रकरणी कंपनीचे चालक किशोर रामचंद्र निकम (रा. आंबेदरे, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्टार केमिकल्स इंडस्ट्रीजमध्ये बिगर परवाना अमोनियम सल्फेट खताची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक कार्यालयाचे निरीक्षक रविराज बचाराम कदम यांनी तिथे छापा टाकला. त्यावेळी तिथे अमोनियम सल्फेटच्या 50 किलो वजनाच्या 80 बॅगा आढळून आल्या. महाराष्ट्र राज्यात अशा खताची विक्री करण्यास परवानगी न घेता अशा प्रकारे बिगर परवाना अवैध खताची साठवण करुन विक्री करुन अत्यावश्यक वस्तू अधिनियमाचा भंग केल्याची तक्रार स्टार केमिकल्स इंडस्ट्रीजचे चालक किशोर निकम यांच्या विरुध्द दिल्यानंतर पोलिसांनी निकम याच्यावर गुन्हा दाखल केला असून,या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.